Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाविश्व१९ वर्षाखालील क्रिकेट टीम भारताने घातली विश्वचषकाला गवसणी!

१९ वर्षाखालील क्रिकेट टीम भारताने घातली विश्वचषकाला गवसणी!

 

नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त चंदने तिसरे तर २०१८ मध्ये पृथ्वी शॉने चौथे विजेतेपद मिळवून दिले. आता यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने पाचव्या विश्वचषकाला गवसणी घातली आहे. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने चार विकेट्स राखत पूर्ण केले आणि विश्वचषकाला गवसणी घातली.

अंडर -19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 189 धावांवर रोखलं. हे लक्ष्य भारतीय संघानं 47.4 षटकातच पूर्ण करून अंडर-19 विश्वचषका 2022चा किताब जिंकलाय.

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूनं 95 धावांची झुंज दिली. तर, भारताकडून बावानं 5 विकेट्स घेऊन इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. 

इंग्लंडच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताला दुसऱ्या चेंडूवर अंगक्रिश रघुंवशीच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यावेळी भारताला आपले खातेही उघडता आले नव्हते. पण त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशिद यांच्यामध्ये ४९ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली. सिंग यावेळी २१ धावांवर असताना बाद झाला आणि कर्णधार यश धुल फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात यश आणि शेख यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. पण यावेळी मात्र तसे घडले नाही. कारण यश १७ धावांवर बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. शेखने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. त्यावेळी भारताची ४ बाद ९७ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकणार की नाही, अशी पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकत होती. पण त्यानंतर गोलंदाजीमध्ये कमाल करणारा राज बावा संघासाठी धावून आला. राजने यावेळी महत्वाच्या ३५ धावा केल्या आणि भारताला विजयासमीप पोहोचवले. दुसरीकडे निशांत सिंधूने दमदार फलंदाजी करत अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

राज बावा आणि रवी कुमार यांनी भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमारने यावेळी इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले. रवी कुमारने यावेळी पहिल्यांदा जेकब बेथेलला दोन धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा कर्णधार टॉन प्रेस्टला त्रिफळाचीत केले, टॉमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर राज बावाने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ठराविक फरकाने चार विकेट्स मिळवले आणि इंग्लंडची ६ बाद ६१ अशी अवस्था केली होती. त्यावेळी इंग्लंडचा संघ १०० धावाही पूर्ण करणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते, पण यावेळी इंग्लंडसाठी जेम्स रेवने १२ चौकारांच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली आणि संघाची धावसंख्या वाढवली. त्यावेळी इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारून भारतीय संघाला मोठा धक्का देईल, असे वाटत होते. पण रवी कुमारने यावेळी जेम्सचा काटा काढला आणि भारतीय चाहत्यांना हायसे वाटले. त्यानंतर रवी आणि राज यांनी प्रत्येकी एक विकेट्स मिळवत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आणला. राजने यावेळी सर्वाधिक ५, तर रवीने चार विकेट्स मिळवल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय