Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावतीन कॅबीनेट मंत्र्याच्या उपस्थितीत हिरडा नुकसान भरपाई विषयी मंत्रालय येथे बैठक संपन्न 

तीन कॅबीनेट मंत्र्याच्या उपस्थितीत हिरडा नुकसान भरपाई विषयी मंत्रालय येथे बैठक संपन्न 

जुन्नर / आनंद कांबळे : पुणे जिल्ह्यातील आदिवाशी बांधवांना हिरडा नुकसानभरपाई देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे तीन मंत्री महोदयांच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे यांनी दिली.

राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे, फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. 

विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेले व नगद रक्कम प्राप्त करून देणारे बाळहिरडा हे एकमेव साधन आहे. सदरील, नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. व नुकसान भरपाई विषयी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी, किसान सभेच्या वतीने सातत्यपूर्ण जनआंदोलन व प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे.

नुकतेच किसान सभेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालय, नाशिक येथे तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांचे व किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांचे फोनवर संभाषण होवून मंत्री अनिल पाटील यांनी यासंदर्भात सबंधित अधिकारी व संघटनेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे घेण्याचे मान्य केले होते.

त्यानुसार, मंत्रालय मुंबई येथे नुकतीच आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे अध्यक्षतेखाली बैठक आदिवासी विकास विभागात पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व मदत, पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील इ. उपस्थित होते.

व याबरोबरच मदत व पुनर्वसन विभाग व आदिवासी विकास विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे व उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे इ.उपस्थित होते.

या बैठकीत निसर्ग चक्रीवादळ मुळे, हिरडा उत्पादक शेतकरी यांचे झालेले नुकसान व ते देण्याची असलेली गरज संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आली. यावेळी हिरडा नुकसान भरपाई देण्यात कोणकोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत या विषयावर चर्चा होवून खालील मुख्य निर्णय घेण्यात आले.

हिरडा नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष बाब म्हणून, मदत व पुनर्वसन विभाग यांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री यांनी मान्यता द्यावी. यासाठी दिलीप वळसे पाटील, डॉ.विजयकुमार गावित, अनिल पाटील हे तीन कॅबिनेट मंत्री प्रयत्न करणार असे ठरले.

याबरोबरच हिरडा नुकसान भरपाई विषयी परत एकदा सुधारित व काही तांत्रिक बदल करून प्रस्ताव देण्याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या. मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री व  वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पुढील 12 दिवसात जिल्हा कृषी अधीक्षक, पुणे हे प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार आहे.

लवकरात लवकर हिरडा नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या विनंतीला अनुसरून मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी सर्व ते  करू, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ.विनोद निकोले यांनी केले होते. व शिष्टमंडळात माकपचे ज्येष्ठ नेते कॉ.ऍड.नाथा  शिंगाडे, किसान सभेचे राज्य सहसचिव डॉ.अमोल वाघमारे, किसान सभेचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी, राजू घोडे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी व एसएफआय विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सोमनाथ निर्मळ इ.उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय