Sunday, May 12, 2024
Homeजिल्हानिर्गुंतवणुकीच्या नावावर केंद्र सरकारने देश विकायला काढला - अमरजीत कौर

निर्गुंतवणुकीच्या नावावर केंद्र सरकारने देश विकायला काढला – अमरजीत कौर

लता भिसे, अरविंद जक्का, अनिल रोहम यांची राज्य समितीवर निवड

अमरावती : भाकपच्या २४ व्या तीन दिवसीय राज्य अधिवेशन अमरावती येथील नेमानी इन येथे रविवारी (दि. १८) संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्धाटन भाकपच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या की, सरकारी मालकीच्या कंपन्या खाजगी उद्योगांना विकून मोदी सरकार देश विकण्याचे आर्थिक धोरण राबवत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. चुकीच्या धोरणामुळे देशात बिकट आर्थिक समस्या निर्माण केली आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यास कमी पडत असल्याने रोजंदारी मजूर आत्महत्या करीत आहे. देशात होत असलेल्या एकूण आत्महत्यांमध्ये २५ टक्के रोजंदारी कामगार असल्याचे सरकारच्या क्राईम ब्युरोच्या अहवालातून पुढे आल्याचे कौर यांनी सांगितले.

२०१४ मध्ये सत्ता मिळाल्यापासून मोदी सरकारने अदानी व अंबानी यांना श्रीमंतीच्या उच्च शिखरावर पोचवले आहे. जनतेला मिळणाऱ्या सर्व सेवांमध्ये कपात केली जात आहे. शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या योजना, राशन आदी विविध लोकपयोगी योजनांवर नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून सवलती कमी केल्या आहेत. या योजनांमध्ये १० टक्के राज्य तर ९० टक्के वाटा केंद्र सरकारचा होता. मात्र, मोदी सरकारने सामाजिक योजनांचा ४० टक्के वाटा राज्यांवर टाकला आहे. आता तर सामाजिक सेवाच बंद केल्या जात आहेत. त्यामुळे या देशात वंचित, उपेक्षित जनसंख्या वेगाने वाढत आहे, अशी टीका अमरजीत कौर यांनी केली.

डाव्या पक्षांची एकजूट करणार – कॉम्रेड भालचंद्र कांगो

डाव्यांच्या एकजुटीशिवाय भारतात कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवकांच्या जीवनात परिवर्तन शक्य नाही, सध्या देशातील संपूर्ण राजकारण, अर्थकारण कार्पोरेट उद्योगपतींच्या बेलगाम अपेक्षा पूर्तीसाठी कार्यरत आहे, असे सांगत एकजुटीसाठी भाकप नेहमीच पुढाकार घेणारा पक्ष आहे. तसेच, डावे पक्ष हे नेहमी लोकशाही व लोकांना बांधिल आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील गतकाळातील सत्ता त्याचे जीवंत उदाहरण आहे. परंतु, तरीही भांडवली पक्ष कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी दर्शवून त्यांच्याबद्दल दुष्प्रचार करतात असा आरोप राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो यांनी केला. तसेच सध्या देशात ‘हम दो-हमारे दो’ अर्थात मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

या अधिवेशनाची सुरवात अमरावती शहरात रॅली काढून झाली. स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. साहेबराव विधळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव तुकाराम भस्मे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, नामदेव चव्हाण, कॉ. शिवकुमार गणवीर, आयटकचे राज्याध्यक्ष सि. एन. देशमुख, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, इत्यादी मंचावर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या प्रतिनिधींची राज्य समितीवर निवड

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या राज्या अमरावती अधिवेशनामध्ये पुणे पिंपरी चिंचवड येथील कामगार चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉम्रेड अरविंद जक्का, कॉम्रेड अनिल रोहम आणि महिला चळवळीतील प्रमुख नेत्या लता भिसे यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये आणि कॉम्रेड अनिल रोहम, कॉम्रेड निलेश दातखिळे यांची महाराष्ट्र राज्य कौन्सिलवर निवड करण्यात आली आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय