Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकुलदैवत म्हणून करत होते पूजा, अन् ते निघालं डायनासोरचं अंडं! मध्य प्रदेशातील...

कुलदैवत म्हणून करत होते पूजा, अन् ते निघालं डायनासोरचं अंडं! मध्य प्रदेशातील प्रकार

मानला तर देव नाहीतर दगड अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मध्य प्रदेशातील लोकांना आला. या गावातील लोक गेली कित्येक वर्षे कुलदैवत म्हणून ज्या गोष्टीची पूजा करत होते, ती गोष्ट म्हणजे चक्क डायनासोरचं अंडं असल्याचं स्पष्ट झालं आहे.या घटनेने सर्वच जण चकित झाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, एमपीमधील पांडलया गावातील वेस्ता मांडलोई हे या गोलाकार वस्तूची पूजा करत. ‘काकर भैरव’ देवतेचं रुप समजून या वस्तूची पूजा त्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरू होती. आपली कुलदेवता शेतीचं आणि पाळीव प्राण्यांचं रक्षण करते असा त्यांचा विश्वास आहे.

असे तयार झाले काकर भैरव

काकर या शब्दाचा अर्थ शेती किंवा रान असा होतो. तर भैरव हे भगवान महादेवाचे दुसरे नाव आहे. केवळ मांडलोई कुटुंबच नाही, तर गावातील इतर घरांमध्ये देखील अशाच प्रकारच्या गोलाकार वस्तूंची पूजा केली जात होती. हे गोलाकार दगड त्यांना आजूबाजूच्या जमीनीमध्ये खोदकाम करताना मिळाले होते. मात्र, आता हे दगड नसून चक्क डायनासोरची अंडी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

असा झाला खुलासा

लखनऊच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉनटीमधील वैज्ञानिक काही दिवसांपूर्वी धार भागात पोहोचले होते. मध्य प्रदेशातील या भागात डायनासोरचे अवशेष मिळाले होते. यानंतर त्यांना समजलं की एका विशिष्ट गोलाकार वस्तूची लोक पूजाही करत आहेत. त्या वस्तूची चाचणी केल्यानंतर वैज्ञानिकांना धक्का बसला. हे सर्व डायनासोरची अंडी असल्याचं या चाचणीमध्ये स्पष्ट झालं. नर्मदेच्या खोऱ्यात डायनासोरचं अस्तित्व होतं याचे कित्येक पुरावे याआधीही मिळाले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात देखील धार भागात डायनासोरची 256 अंडी मिळाली होती. ही डायनासोरची अंडी असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरीही आपण यांची पूजा करणं थांबवणार नसल्याचं पांडलया गावातील नागरिकांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय