Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडफेरीवाल्यांचे महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन

फेरीवाल्यांचे महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवना समोर आज पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज तीव्र आंदोलन करत हॉकर झोन मध्ये सोयी सुविधा द्याव्या व महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई व एकतर्फी निर्णयाचा जाहीर निषेध केला. शहरातील दापोडी, निगडी, आकुर्डी, भोसरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, घरकुल, पिंपरी, सांगवी चौक आदी परिसरातील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांचे प्रदर्शन केले.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, माजी नगरसेवक मारुती भापकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, किरण साडेकर, रोहिदास शिवणेकर, अनिल मंदिलकर, सुखदेव कांबळे, तुकाराम माने, संभाजी वाघमारे, वहिदा शेख, माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, अरुणा सुतार, नंदा तेलगोटे, जरिता वाठोर, शारदा राक्षे, आशा बनसोडे, छाया देशमुख, मुमताज शेख, फरीद शेख, निरंजन लोखंडे, सुशेन खरात व पदाधिकारी उपस्थित होते.

नखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरजेचे आहे‌. मात्र, आयुक्तांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही, तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी विविध ठिकाणी झोनचे निर्मिती सुरू केली. मात्र, आत्ताचे आयुक्त शेखर सिंह हे या कायद्याच्या अंमलबजावणीस टाळाटाळ करीत असून ज्या ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती केली आहे, तिथे पाणी, वीज, स्वच्छता व इतर सुविधा देण्यास अति.आयुक्त जितेंद्र वाघ हे टाळाटाळ करत असून हा सर्वसामान्य विक्रेत्यावरती अन्याय होत आहे.

तसेच सदरच्या ठिकाणी काही समाजकंटकाकडून विनाकारण तक्रारी करून त्रास देण्याचा जाणून-बुजून प्रयत्न केला जात आहे. याचा महासंघाकडून निषेध करण्यात आला. महानगरपालिकेकडून सन 2012/14 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या लोकांना जाणून-बुजून बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जात नाही, त्याप्रमाणे सध्या सणाचे दिवस असल्यामुळे हातगाडी, स्टॉल धारकावरील कारवाई थाबंवणे गरजेचे आहे.

मारुती भापकर म्हणाले की, हातगाडीवर व्यवसाय करून जगणाऱ्या लोकांकडे महानगरपालिकेचे कायमच दुर्लक्ष झालेले आहे, महानगरपालिकेचे अधिकारी ए सी मध्ये बसून काम करतात त्यांना या लोकांच्या भावना काय समजणार ? अनेक वेळा शहरांमध्ये आंदोलन होतात आणि ते मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र गोरगरिबांच्या या कायद्याकडे नेहमीच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढेही असंच राहिली परिस्थिती राहिले तर फेरीवाल्यांनी एकजुटीने मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांचा केला निषेध !

आंदोलनानंतर शिष्टमंडळांना बोलवण्यात आले त्यावेळी आयुक्त शेखर सिंह यांना भेटण्याचा आग्रह शिष्ठमंडळाने केला‌. मात्र, शेखर सिंह उपलब्ध नव्हते म्हणून शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना भेटून मुद्दे रखडीलेल्या मागण्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. असता त्यांनी उद्घाट व उलट सुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. प्रशासनाधिकारी हे काम चोखपणे बजावणे गरजेचे असताना त्यांनी आम्ही करू शकत नाही अशा प्रकारचे बोलून उद्धट भाषा वापरली म्हणून शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा न करता परत आले. आता, आयुक्त यांचेशी लवकरच चर्चा घडवून देण्याचे आश्वासन पोलीस व सुरक्षा प्रशासनाने दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय