पुणे : सर्व शासकीय योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, योजनांची गतिमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून (ता. १५) जत्रा शासकीय योजनांची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
१५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जाणार आहे.
शासकीय कार्यालयात येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा येणे असे हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रांत त्रुटी असल्यास त्याला पुन्हा सरकारी कार्यालयांत जावे लागते. अनेकजण योजनांपासून वंचित राहतात.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख असून इतर सर्व विभाग त्यांच्या समन्वयाने काम करतील.उपक्रम कालावधीत ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.