Saturday, May 18, 2024
Homeजिल्हासंविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

संविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

नाशिक : कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी वेदोक्त पूजाविधी करावा. भारतीय संविधानाने सर्वांना एकसमान मानले आहे. वर्णव्यवस्था सर्वांसाठी घातक असून, समाज अजून किती दिवस वर्णव्यवस्थेतच राहणार आहे, असा प्रश्‍न माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीकाळाराम मंदिरात केला.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना काळाराम मंदिरात (Nashik) वेदोक्त पद्धतीने पूजाविधी करण्यास रोखले असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी डाव्या हाताला काळी फीत बांधून शनिवारी प्रसिद्ध काळाराम मंदिरात येऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.

या वेळी तिरंगा झेंडा व भारतीय संविधानाची प्रत हाती घेऊन त्यांनी मंदिरात प्रवेश केला. वेदोक्त पूजाविधी सर्वांना एकसारख्या पद्धतीने लागू केल्यास भविष्यात अशा प्रकारचा वाद पुन्हा निर्माण होणार नसल्याचे आमदार आव्हाड यांनी सांगितले.

श्री. आव्हाड यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत सांगितले, की ‘वसुधैव कुटुंबकम’ मानणारा मी धर्माभिमानी हिंदू आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद निर्माण होत आहेत. छत्रपती घराण्यास आजही अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. अजून किती दिवस वर्णव्यवस्थेत समाज राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ब्राह्मणवृंद आणि त्यांचे धर्मपीठ यांनी विचार करून वर्णव्यवस्था मिटवून सर्व समाज एकसमान मानून त्यांना वेदोक्त पूजाविधी करण्याची मागणी केली.

मंदिरात महंत उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. महंत उपस्थित असते, तर त्यांच्याकडून आमची बौद्धिक पातळी तपासून घेतली असती, असेही आव्हाड यांनी सांगितले. या वेळी त्यांनी सनातनींवर जोरदार शब्दात टीकाही केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय