नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी देशवासियांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदी माझी निवड केल्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करते. ही जबाबदारी मिळणं हे माझं सौभाग्य आहे. मी राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले हे माझं वैयक्तिक यश नाही, तर हे देशातील प्रत्येक गरिबांचे यश आहे, असे त्या म्हणाल्या.
देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दहा मिनिटं भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना हात घातला. त्या म्हणाल्या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात माझी राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. कारण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. देश स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी मिळणं माझं मोठं सौभाग्य आहे. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या आशा ठेवल्या होत्या. त्यासाठी काम करावे लागेल. सर्वांचे प्रयत्न आणि सर्वांचे कर्तव्य या मार्गाने जावे लागावे. कर्तव्य पथावर जाऊन आपल्याला पुढे जावं लागेल. उद्या कारगील दिवस आहे. देशाच्या सेना आणि जनतेला कारगील विजय दिवसाच्या शुभेच्छा देत आहे, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील सर्वच पक्षाचे नेते, सर्व केंद्रीय मंत्री आणि सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींचं अभिनंदन केलं.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू ?
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून 1979 मध्ये द्रौपदी मुर्मू बीए उत्तीर्ण झाल्या. त्यांनी नगरसेवक, आमदार ते झारखंडच्या राज्यपाल याही पदावर काम केले आहे. तसेच त्या आदिवासी जमाती आयोगाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.