Wednesday, May 8, 2024
Homeजिल्हाभाजप च्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदिवासी शाळांना साहित्य वाटप

भाजप च्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदिवासी शाळांना साहित्य वाटप

पिंपरी चिंचवड : देशातील शेवटच्या घटकाचा विकास आणि सेवाभावी वृत्ती हा भाजपाचा विचार आहे. त्यामुळेच आज आदिवासी समाजातील पहिली महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मूर्मु यांना संधी मिळाली. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनीही आपली कारकीर्द यशस्वी केली. देशातील वंचित, दुर्लक्षित समाजाच्या हितासाठी भाजपाचे योगदान आहे. देशातील सामान्य व्यक्ती सर्वोच्चपदापर्यंत आपण पोहोचू शकतो, असा विश्वास विश्वास भाजपाने देशवासियांच्या मनात निर्माण केला, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

देशाच्या राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मूर्मु यांची निवड झाल्याबद्दल तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील आदिवासी शाळांमध्ये शालेयपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विनायक थोरात, जनजाती सुरक्षा मंचचे ऍड. किरण गभाले, अशोक गभाले, निलेश साबळे, दिलीप देशपांडे, अमोल डमरे, सुरेश कौदरे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण समितीचे पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थांचे पदाधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खरोशी, ता. खेड, शिवाजी विद्यालय व कला व वाणिज्य महाविद्यालय, डेहणे, ता. खेड, शिवशंकर विद्यालय व चिंतामनराव मोरमारे कनिष्ठ विद्यालय, तळेघर, ता. आंबेगाव, श्री.पंढरीनाथ कला- वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मु.पो. पोखरी, ता. आंबेगाव, विश्व हिंदू परिषद वनवासी विद्यार्थी वसतीगृह, राजगुरूनगर, ता. खेड, कुंडेश्वर विद्यालय, पाईट, ता. खेड, सेवाग्राम ट्रस्ट माळेगाव, ता. मावळ, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, भरतवाडी, कल्याण आश्रम, पोखरी, ता. आंबेगाव, आदी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात आले. एकूण ८ शाळांमध्ये संगणक, खुर्च्या, टेबल, ग्रंथालयातील साहित्य, ब्लॅक बोर्ड, छत्री, रेनकोट, इलेक्ट्रिक आवश्यक साधने, किराणा सामान आदी सुमारे २० लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले. विशेष म्हणजे, काही शाळांचे थकीत वीजबिलही भरण्यात आले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, समर्पण आणि सेवाभाव हाच भाजपाचा संस्कार आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आदिवासी शाळांना शालेयपयोगी व जीवनावश्यक साहित्य भेट दिले. दि. २२ व २३ जुलै असे दोन दिवस स्वतः उपस्थित राहून सुमारे २ हजार ३०० विद्यार्थ्यांना थेट मदत करता आली, याचे विशेष समाधान वाटते.

नरेंद्र मोदींनी राजकीय घराणेशाही मोडीत काढली

२०१४ पर्यंत आपल्या देशात विशिष्ठ घरातीलच पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार अशी भावना होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय घराणेशाही मोडीत काढली आणि सामान्य कुटुंबातली व्यक्तिसुद्धा देशाच्या सर्वोच्च पदावर बसू शकते, हा विश्वास भारतवासीयांना दिला. त्यामुळे राष्ट्रपती मूर्मु यांचा विजय आम्ही आदिवासी बांधवांना पेढे- मिठाई वाटून साजरा केला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आम्ही आदिवासी मुलांना शालेय साहित्य भेट देऊन साजरा केला. केवळ भोसरी विधानसभा मतदार संघाचा आमदार म्हणून नाही. तर राज्याचा विधिमंडळ सभागृहाचा सदस्य म्हणून कोणत्याही दुर्लक्षित घटकांच्या अडचणी सरकारसमोर मांडू शकतो. त्यामुळे यापुढील काळात मला कधीही हाक द्या मदतीसाठी तत्पर राहीन, असा विश्वास आमदार लांडगे यांनी संबंधित शिक्षण संस्थांना यावेळी दिला.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय