Friday, May 10, 2024
Homeराज्यDigital India : भूमिअभिलेखची जुनी कागदपत्रे आता बघता येणार ऑनलाइन, अशी पाहा...

Digital India : भूमिअभिलेखची जुनी कागदपत्रे आता बघता येणार ऑनलाइन, अशी पाहा कागदपत्रे

पुणे : राज्यातील भूमिअभिलेख विभागाची सुमारे चार कोटींहून अधिक जुनी कागदपत्रे नागरिकांना पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या राज्यातील बारा जिल्ह्यांतील जुनी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील कागदपत्रे लवकरच ऑनलाइन करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने नागरिकांना ऑनलाइन अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्याचा निर्णय सन 2011 मध्ये घेतला. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला.

त्यानुसार जिल्हानिहाय विभागणी करून फेरफार, सातबारा, आठ-अ, क-ड-ई पत्रक, हक्क नोंदणी पत्रक, इनाम पत्रक, जन्म- मृत्यू, लेजर बूट, खासरा पत्रक, जोड तक्ता, कुळ नोंदणी, पेरे पत्रक, रेकॉर्ड हक्क पत्रक, गाव नकाशा, टिपण अशा जवळपास 23 कागदपत्रांचे तहसील स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच, हक्क नोंदणी वही, गुणाकार पुस्तक, आकारफोड, कजाप, दशमान, शेतपुस्तक, पुरवणी पत्रिका, ताबेपावती, शेतवार, पोट हिस्सा पत्रक- टिपण, निस्तार, चौकशी, शहर सर्वेक्षण पुस्तिका अशा सुमारे 20 पेक्षा अधिक कागदपत्रांचे भूमिअभिलेख स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहेत.

तहसील स्तरावर सहा जिल्ह्यांतील तीन कोटी 73 लाख 198 कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तर भूमिअभिलेख स्तरावर सहा जिल्ह्यांतील चार लाख तीन हजार 350 अभिलेख डिजिटल स्वाक्षरीयुक्त केले आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अभिलेख भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तहसील स्तरावर नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमधील तब्बल तीन कोटी 73 लाख 198 अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच, सातारा, गोंदिया, नंदूरबार, जालना, लातूर, अमरावतीतील भूमिअभिलेख स्तरावर चार लाख तीन हजार 350 अभिलेख डिजिटल स्वाक्षरीयुक्त केले आहे. असे एकूण तीन कोटी 77 लाख तीन हजार 548 कागदपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे, असे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय