Wednesday, May 22, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीअवघ्या ७ वर्षाच्या चिमुकलीने सर केले १०० किल्ले, पाहा तिची कमाल...

अवघ्या ७ वर्षाच्या चिमुकलीने सर केले १०० किल्ले, पाहा तिची कमाल…

पुणे : लहानपणापासून एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर ते कमाल करतात यात वाद नाही. लहान मुलांमध्ये पालकांकडून अनेक गुण आलेले असतातच पण त्यांना लहान वयात काही गोष्टींची माहिती करुन दिली तर त्यांच्या आवडीच्या गोष्टीत ते स्वत:ला तयार करत जातात.लहान वयात कलेमध्ये किंवा एखाद्या खेळात निपुण असणारी मुलं आपण आजुबाजूला पाहत असतो. पण अनेकदा त्यांची कृती आपल्याला थक्क करणारी असते. नुकतीच अशाच एका चिमुकलीची गोष्ट समोर आली असून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने १-२ नाही तर तब्बल १०० किल्ले सर केले आहेत. इतक्या लहान वयात इतके किल्ले सर करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण तिच्यातील जिद्द आणि तिला मिळालेला पाठिंबा यामुळे हे शक्य झाले असावे.या चिमुकलीचे नाव शर्विका म्हात्रे असे आहे. शर्विका अलिबागची असून तिच्या या विक्रमाने अनेक जण थक्क झाले आहेत. अशाप्रकारे १०० किल्ले सर केल्याने तिच्या नावावर एका अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. वयाच्या २.५ व्या वर्षी तिने गिर्यारोहणास सुरुवात केली आणि रायगड किल्ला सर केला होता. तर नुकताच तिने अतिशय अवघड चढाई असलेला पुण्यातील जीवधन किल्ला सर केला. याठिकाणी ती ३००० फूटांवर चढाई करुन गेली. विशेष म्हणजे तिने प्रत्येक किल्ल्यावरची माती गोळा करुन आणली असल्याने तिच्याकडे आता या किल्ल्यांवरील मातीचेही संकलन आहे. ते तिने अतिशय छान जपून ठेवले आहे.


या अनोख्या आवडीसाठी तिने कोणतेही खास प्रशिक्षण घेतलेले नसून केवळ आवड जपण्यासाठी ती हे करते असे तिचे वडील जितेन म्हात्रे म्हणाले. पुढच्या वर्षी तिला गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेले भिंत चढण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शर्विकाचे आईवडील शिक्षक असून तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. पनवेलमधल्या सर्वांत उंच कलावंतीण किल्ला सर करणारी शर्विका ही राज्यातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. येत्या काळातही आणखी किल्ले सर करण्याचा शर्विकाचा मानस आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय