आळंदी/अर्जुन मेदनकर: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर भक्त आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रवर्तक श्रीगुरु हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या पिंपळनेर पायी दिंडी वारीस आळंदीतून हरिनाम गजरात प्रस्थान करीत निरोप देण्यात आला.
श्रीगुरू हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या पायी दिंडी वारीस परंपरांचे पालन करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातून धार्मिक परंपरा जपत दिंडीने प्रवास सुरु केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या सुविद्य पत्नी मालकीणबाई कोकिळाताई आरफळकर पवार, मालक, बाळासाहेब आरफळकर पवार, माऊली भक्त स्वामी सुभाष महाराज यांचे हस्ते मानाचे श्रीफळ प्रद्य घेऊन वीणा मंडपात नित्य पंचपदी, मंदिर प्रदक्षिणा केली. यासाठी आळंदी देवस्थानचे वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
दिंडीने महाद्वार येथे विणेकरी जनार्दन ढाकणे यांनी परंपरेचे अभंग व आरती घेत दिंडीस हरिनाम गजरात निरोप देण्यात आला. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ भोसले यांनी भोसले निवास पडाळीवर दिंडीचे स्वागत केले. यावेळी मानाच्या विणेचे पूजन करण्यात आले. भोसले परिवाराचे वतीने वारकरी, भाविक, नागरिकांचा पाहुणचार करण्यात आला. श्रींची विना पायी दिंडी प्रवास करीत महादेव वाडी मुक्कामी राहील. पुढे हरिनाम गजरात लाखेवाडी, मलठन, राळेगण थेरपळ करत श्रीक्षेत्र निळोबाराय मंदिर पिंपळनेर येथे पोहचेल अशी माहिती स्वामी सुभाष महाराज यांनी दिली.