Tuesday, April 23, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर... 

विशेष लेख : छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर… 

जाती, धर्म, भाषा, पंथ आणि प्रांत या पलिकडे जाऊन ज्या राजाचा जयजयकार केला जातो. तो म्हणजे शिवाजी. लोकशाहीचा स्विकार करूनही राजेशाहीतील राजाचा जयजयकार करतो त्याचे कारणही तितकेच आगळे आणि वेगळे आहेच.

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सायंकाळी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. जिजाऊंनी त्यांना स्वराज्याचे बाळकडू दिले. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागिरदारी होती. जिजाऊ त्यांना शौर्याच्या गोष्ट सांगत. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली अगदी लहान वयात शिवाजींनी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने परगण्याची व्यवस्था पहावी अशी व्यवस्था केली गेली होती. येथून शिवाजींच्या राज्यकारभाराला सुरू झाली. शिवाजीच्या जीवनपट आपल्याला निश्चित माहित आहे. परंतु एका द्रष्ट्या राजाचे वर्तन काय होते. ते नुसते ऐकणे पहाणे गरजेचे आहेच, परंतु ते वर्तनात आणण्याची नितांत गरज आहे.

शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात वेगळेपण होते. ते म्हणजे शिवाजीचे कार्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपले वाटत होते. त्यामुळेच रयत आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होती. एक सामान्य गरीब कुटुंबातील शिवा न्हावी; ज्याला माहित होते, खोटा शिवाजी बनून आपल्याला पकडून घ्यायचे आहे आणि आपण पकडलो जाणार आहोत. त्यानंतर आपला खात्मा होणार आहे. तरी तो मरणासाठी तयार झाला. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले आणि सिद्दी जोहारने पाठलाग सुरू केला. त्यावेळी मुठभर मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू लढला. तो म्हटला ” आपण गेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभले आहे ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा”. पुन्हा तीच त्यागाची भावना पहावयास मिळते. अशी अनेक उदाहरणं इतिहासात पहावयास मिळतात. आज भारतासारख्या लोकशाही देशात जनतेचं विचार करणारे लोकप्रतिनिधी दुर्मीळ झाले आहेत. जनतेचा वापर ते जनतेलाच लुटण्यासाठी करू लागले आहेत. याचा विचार करण्याची गरज आहे. शिवाजीच्या नावाचा फक्त जयजयकार सुरू आहे, कृतीत आपण मात्र शून्य आहोत.

शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुध्दा आपल्या परिनं सहभागी होती. त्याला फार मोठे महत्त्व आहे. राज्याच्या कार्यात जेव्हा रयतेचा मनापासून सहभाग असतो, तेव्हा कार्य यशस्वी होतं हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलं. ते जनतेचं कार्य होतं म्हणून ते यशस्वी झालं. सर्वस्वाचा त्याग करीत रयत शिवकार्यात सहभागी होत होती. लोभ-प्रलोभापलीकडे जाणून मृत्यूला कवटळणाऱ्या पराक्रमाचा हा दैदिप्यमान इतिहास आहेच. कारण शिवाजीचे कार्य सुरू झाले आणि राजेशाहीचे स्वरूप बदलले. रयतेकडून वसूलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. रयतेवर जुलूम करू नये, अशी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली गेली.

सरंजामदारीच्या काळात स्रियांंच्या अब्रुला विशेषतः गोरगरीब स्रियांच्या अब्रुला किंमत नव्हती. गोरगरीबांच्या लेकी-सुना म्हणजे हव्या त्या वेळी उपभोगाच्या वस्तू होत्या. शिवाजी राजानं त्याला पायबंद घातला. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलांने गरीब शेतकऱ्यांच्या तरण्याताठ्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली अन् भोगली. माती झालेल्या जिण्यापेक्षा मरणं बरं म्हणून पोरीनं जीव दिला. शिवाजीच्या कानी ही घटना पोहोचली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली. अशा इतरही घटना आहेत. १६७८ सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडी किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहाद्दर स्रीने २७ दिवस किल्ला लढविला, पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढवयास लावले व त्याला जन्मभर तुरूंगात डांबले. कारण शिवाजीची भूमिका होती, “स्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग ती कुणीही असो !”

२१ व्या शतकात असलेल्या भारतातील पुरोगामी, न्यायी महाराष्ट्रात स्रीयांवर बलात्कार होतात अन् बलात्काराकडे दुर्लक्ष केले जाते. आताही तीच परिस्थिती आहे. गोरगरीबांच्या लेकी-सुना म्हणजे हव्या त्या वेळी उपभोगाच्या वस्तू झाल्या आहेत. अन्यायाची दाद मागता येते पण न्याय होईल का सांगता येत नाही. इतकेच नव्हे बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे शिवाजीचा जयजयकार करतात, देशाची शान असलेला तिरंगा सुध्दा घेऊन बलात्काऱ्याच्या समर्थनात मोर्चा काढण्याची मजल गेली आहे. ही महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला काळीमा फासणारी बाब आहे.

शिवाजींंकडे देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्यापासून होणारा छळ, अन्याय अत्याचार याची जनतेला दाद मागता येऊ लागली. वतनदारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. राजा आणि रयतेचा संबंध येऊ लागला. त्यांची विचारपुस करू लागला. त्याच्यावर अन्याय होऊ नये, म्हणून दक्ष राहू लागला. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे. उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. रयतेचे मोठे नुकसान होई. तसेच सैन्यातील दाणा- वैरण रयतेकडून घेतली जाई. शिवाजींनी सक्त आज्ञा केली. 

“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये.” “सैन्यातील घोड्यांना दाणा- वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे.” 

ही फक्त आज्ञा नव्हती तर तिचा अंमलबजावणी होत होती. आज पायदळ, घोडदळ नसले तरी सरकारी मोटारदळ आहेत. आजच्या कारभारात जनतेच्या पिकाची काळजी होते का? त्याची विचारपुस होते का? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सहानुभूती दाखविण्यासाठी दौरे होतात, परंतु जेव्हा शेतकरी मायबाप हातात लाल झेंडे घेऊन देशाची आर्थिक राजधानीकडे १८० किलोमीटर पायी चालत अगेकुच करतो, काही बाबतीत दाद दिली जाते. पण पिकाच्या हमीभावचे काय? नेत्याचे दौरे होतात अन् ते कशापध्दतीने होतात आपण जाणता आहात.

शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि ते राहणार आहेतच. शिवाजी हिंदू होता. साहजिकच शिवाजीसंबंधी हिंदूंना अभिमान वाटतो. त्यामध्ये गैर काहीच नाही. परंतु ते मुसलमानांच्या विरूद्ध होते असे नव्हते. अशा प्रकारचा गैरसमज करणाऱ्यांंना आपण प्रश्न विचारला पाहिजे? शिवाजींच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार व इतर चाकर होते. त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या अशा आरमार विभागाचा प्रमुख दर्यासारंग दौलतखान होता, शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खाजगी नोकरात मदारी म्हेतर यांचा समावेश होता. आग्र्याच्या सुटकेवेळी याच मुसलमान साथीदाराने साथ दिली. सरदारापासून शिपायांसह मुस्लिम शिवाजींच्या चाकरीत होते. शिवाजींंचे मुस्लिम द्वेषी नव्हते. त्यांचे धोरण स्पष्ट होते. रयतेचे भले झाले पाहिजे, रयत सुखी झाली पाहिजे. रयत आज पिचली जात आहे, शोषली जात आहे, देश एकसंध असताना नागरिकत्व सुधारणा, एनआरसी आणि एनपीआर आणून देशात फुट पाडली जात आहे, हजारोंचे मोर्चे निघूनही शासनकर्ते दाद देत नाहीत, तेव्हा वाटते. राजे तुम्ही हवे होता!

रियासतकार सरदेसाई आपल्या “शतकर्ता शिवाजी ” या पुस्तकात लिहितात, “सन १६६४ च्या सुमारास विजापूरच्या पाच-सातशे पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, “तुमचा नाव लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही, अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने आठरा जाती, चारी वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे.

शिवाजींंची धर्मावर श्रद्धा होती. श्रध्देप्रमाणे ते वागत होते. देव-देवतांना साधूंना पूजीत होते, धर्मांसाठी व देवळासाठी खर्च करत होते. परंतु ते इस्लाम धर्माविरुद्ध नव्हते. २ नोव्हे. १६६९ च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे.

“श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा धर्म त्याचा त्यानी करावा, यात कोणी बखडो करू नये असे फर्मावले आहे.”

शिवाजी महाराजांना जसे मुस्लिम राजकर्त्यांन् विरूद्ध लढाया कराव्या लागल्या , तशा हिंंदू राजकर्त्यांविरूद्ध ही लढाया झाल्या. त्यामध्ये मराठे पण होतेच.

रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात…”विजापूरकरांशी युध्द म्हणजे म्हणजे हिंदू-मुसलमानातील युध्द नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युध्दास येणे शक्य नव्हते..” शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांची ताब्यात गुंतलेली मोठीमोठी घराणीही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्य बुध्दी नव्हती. मोहिते, घोरपडे, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी-जास्त प्रमाणात शिवाजीविरूध्द होते.

आज शिवाजींचा वापर मुस्लिम धर्माविरुद्ध, हिंदू धर्म रक्षक, गोब्राह्मण प्रतिपालक असा केला जात आहे. त्यातून धर्मद्वेष पसरवला जात आहे. त्यांना त्याचा जाब द्यावा लागेल. आज जो अपप्रचार चालू आहे तो थांबविण्यासाठी आपण खरा इतिहास सांगण्याची गरज आहे. शिवाजींचे राज्य हे जनतेचे राज्य होते. जनतेला मदत व्हावी यासाठी होते. शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची काळजी करणाऱ्या रयतेचं राज्य निर्माण केलं.

शिवाजी हा कुठल्या एका प्रांताचा राजा नव्हता आणि तो नाही. शिवाजीला मानणारा मोठा जनसमुदाय काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. शिवाजींचे अफाट कार्य सबंध जनतेने ओळखले आहे, त्यामुळेच जयजयकार केला जातो. परंतु शिवाजींना जातीत बंदिस्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. हिंदू धर्माचे रक्षक म्हणून त्यांची प्रतिमा रंगविली जात आहे. महाराष्ट्रात जन्मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जातीचे विखारी बीज पेरत आहेत. त्याला जनतेत रूजविण्यासाठी हिंदू एकता, हिंदू महासभा, वनवासी कल्याण आश्रम, पतित पावन संघटना, शिवप्रतिष्ठान निर्माण केल्या जात आहे. हा अपप्रचार वेळीच बंद करण्यासाठी तुम्हा आम्हा जाणत्या पिढीला खरा शिवाजी जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. खरा शिवाजी सांगणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांना याच सनातनी प्रवृत्तीने ठार केले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक घराघरात पोहोचविण्याची गरज आहे.

आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला , पण रयतेचा छळ थांबलेले नाही. राजेशाही व्यवस्थेत शिवाजी सारखा राजा होऊन गेला. परंतु लोकशाहीमध्ये संविधानाचा विधायक वापर होण्यासाठी रयतेची कळवळा असणाऱ्या लोकप्रतिनिधींची आज खरी गरज आहे. वाढते अत्याचार, बलात्कार, सावकरी पाश, गुन्हेगारी, दारिद्रय, वाढती सामाजिक दरी, भुकमारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या यांना रोखण्यासाठी द्रष्टा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. आज देशाला शोषणमुक्त समाजाव्यवस्थेची गरज आहे. जेथे रयतेचे राज्य असेल. शिवाजी महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांचा अंगिकार करावा लागेल, फक्त जयजयकार करून चालणार नाही. विद्यार्थी-युवकांनी शोषणमुक्त समाजानिर्मितीसाठी पुढे आलेच पाहिजे!

नवनाथ मोरे

लेखक, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिवमंडळ सदस्य आहेत. 

[email protected]

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय