Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडछत्रपती शिवरायांच्या रूपातील गणेश मुर्ती स्थापना आणि विक्रीस प्रतिबंध घालण्याची मागणी

छत्रपती शिवरायांच्या रूपातील गणेश मुर्ती स्थापना आणि विक्रीस प्रतिबंध घालण्याची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : छत्रपती शिवरायांच्या रूपातील गणेश मुर्ती स्थापना आणि विक्रीस प्रतिबंध घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केली. असे प्रकार करून छत्रपती शिवरायांचा अवमान करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला. Demand to prohibit installation and sale of Ganesha idols in the form of Chhatrapati Shiva Maharaj

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनाय कुमार चौबे यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला. जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लाभे, सचिव गणेश कुंजीर, शहर संघटक निरंजन सोखी आदीसह पदाधिकारी यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांना अखंड भारतातील नागरिक आराध्य दैवत मानतात. शिवरायांनी आपल्या स्वकतृत्वाने स्वराज्य घडविले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित करून स्वराज्य रक्षण केले. शेतकऱ्यांना पूरक योग्य प्रकारचे धोरणे आखली. स्त्रियांचा सन्मान केला. चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले नाही. त्यामुळे बहुजनांमध्ये छत्रपती शिवरायांविषयी आदराची भावना आहे. मात्र, काही समाज विघातक लोक त्यांचा सातत्याने अवमान करत आहेत. हे महाराष्ट्रात कदापीही सहन केले जाणार नाही.

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची मंडळाकडून तयारी सुरू असल्याचे दिसते. काही मुर्तीकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील गणेशमुर्ती तयार करत आहेत. त्याच मुर्ती काही दिवसांनी विक्रीसाठी येणार आहेत. शिवरायांच्या रूपातील याच गणेश मुर्तीची १० दिवस स्थापना करण्यात येणार असून १० दिवसा नंतर याच प्रतिकात्मक स्वरूपातील मुर्ती नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जगभर पसरलेला आहे. ज्या महापुरूषाने आपल्या पराक्रमाने स्वराज्य निर्माण केले आहे. अशा महाराजांच्या रूपातील गणेश मुर्ती नदीमध्ये व इतर ठिकाणी विसर्जित होण्याची शक्यता आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. सदरचा प्रकार संतापजनक, चिड आणणारा तसेच अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे. 

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळास छत्रपती शिवरायांच्या रूपातील गणेश मुर्ती विक्रीस व मुर्ती स्थापना करण्यास पोलीस प्रशासनाने प्रतिबंध घालावा.अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा सतीश काळे यांनी दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय