Saturday, April 27, 2024
Homeराज्यआदिवासी विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

आदिवासी विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका आदिवासी विद्यार्थ्याचा छळ करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरास खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर मधील एका शाळेत अथर्व अनिल लोहकरे, वय १५ या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री अनिल लोहकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम भादवि ३०६ व ३४ या कलामान्वये अभिजीत शशिकांत सराफ व भूषण प्रभाकर साठे या दोन आरोपीविरुद्ध २० ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ चे सुमारास या दोन्ही आरोपींना पोलिसांनी दुपारी चौकशी करिता श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बोलविले होते व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असताना अटक करण्याऐवजी सोडून दिल्याचा आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने केला आहे. तसेच अथर्व लोहकरे या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी एसएफआयने केली आहे.

एसएफआयने आपल्या निवेदनात आत्महत्येस प्रवृत्त करणे हा प्रचंड निंदनीय आणि अमानवीय प्रकार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिस राजकीय दबावाखाली असल्याने आरोपींना अटक न करता सोडून दिल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. मयत विद्यार्थी आदिवासी समाजातील असून त्याच्या कुटुंबावर झालेला अन्याय व या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा त्याविरोधात एसएफआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय