Friday, May 17, 2024
Homeजिल्हाआरोग्यसेवेचे विकेंद्रीकरण व जनताभिमुख सेवा हे केरळ मॉडेलचे वैशिष्ट्य – माजी आरोग्यमंत्री...

आरोग्यसेवेचे विकेंद्रीकरण व जनताभिमुख सेवा हे केरळ मॉडेलचे वैशिष्ट्य – माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा टिचर

पुणे : एस. एम. जोशी हॉल, पुणे येथे जन आरोग्य मंच व पुणे कलेक्टीव आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये ‘ केरळ आरोग्य मॉडेल – एक पाऊल सार्वत्रिक आरोग्य सेवेकडे’ ह्या विषयावर माजी आरोग्यमंत्री के के शैलजा टिचर ह्यांनी आपले विचार मांडले.

निपाह साथ रोग व कोरोना महामारी मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी ची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली. आपल्या देशात सर्व राज्यांत आरोग्य निर्देशांकात केरळ राज्य सतत अग्रेसर आहे. तेव्हा केरळ आरोग्य मॉडेल बद्दल सर्वांना कुतूहल निर्माण झाले आहे. ‘आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण व‌ लोकाभिमुख आरोग्य सेवा तसेच पुर्वतयारी व नियोजन हे ह्या मॉडेलचे वैशिष्ट्य आहे. केंद्र सरकार जीडीपी च्या एक टक्काच्याही कमी सार्वजनिक आरोग्यावर खर्च करीत आहे. ह्याचा आरोग्य सुविधा व‌ सेवेवर परिणाम होत आहे.

उत्पन्नाच्या दृष्टीने गरीब राज्य असुनही ‌मुलभूत आरोग्य सेवेला केरळमध्ये प्राधान्य आहे. सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व दर पाच हजार लोकसंख्येस एक उप आरोग्य केंद्र आहे. आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना महामारीत तालुका व जिल्हास्तरावरील हाॅस्पिटलमध्ये बेड वाढवले, आॅक्सिजन व आयसीयु ची सुविधा उपलब्ध केली आहे. औषधीखरेदी साठी व वितरणासाठी राज्य सरकारने केरला मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. त्यामुळे औषध खरेदी मध्ये पारदर्शकता व सुलभ वितरण होते व औषधांचा तुटवडा निर्माण होत नाही, असे शैलजा टीचर यांनी सांगितले.


आरोग्य सेवेच्या गुणवत्ता पुर्ण सुधारणेसाठी खाजगी व दानशूर व्यक्तींचीही मदत घेतली. बाल मृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी योग्य नियोजन केले. संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्याबरोबरच रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेह व कॅन्सर स्क्रिनिंग साठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची व राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असते. त्यामुळे केरळ आरोग्य मॉडेल हे सार्वत्रिक आरोग्य सेवां साठी कटीबद्ध आहे.”

ह्या कार्यक्रमाचे प्रयोजन तथा जन आरोग्य मंचचे ध्येय व उद्दिष्टे, जन आरोग्य मंच चे अध्यक्ष डॉ.किशोर खिल्लारे ह्यांनी प्रास्ताविकात सांगुन माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा टिचर ह्यांचे तथा उपस्थितांचे स्वागत केले.

आभार प्रदर्शन डॉ. सुधीर दहीटनकर ह्यांनी, तर डॉ. ज्ञानेश्वर मोटे ह्यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनवादी महिला संघटनेच्या काॅ. किरण मोघे होत्या. ह्यावेळी विचारमंचावर पुणे जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सचिव कॉ. गणेश दराडे उपस्थित होते.

कार्यक्रमात अनेकजण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यकर्ते, जन आरोग्य मंच, पुणे कलेक्टीव, एस एफ आय, डी वाय एफ आय, सिटु व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यां तसेच वैद्यकीय विद्यार्थी देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय