Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत प्रस्थानला गर्दीवर नियंत्रण गरजेचे – गोविंद शिंदे

आळंदीत प्रस्थानला गर्दीवर नियंत्रण गरजेचे – गोविंद शिंदे

दिंड्यातील वारक-यांचे संख्येवर मर्यादा आणण्यास सूचना

आळंदी / मल्हार काळे : माऊली मंदिरात पालखी सोहळा श्रींचे प्रस्थान दिनी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आळंदी देवस्थानने संबंधित यंत्रणांची दिंडी प्रमुखांची स्वतंत्र बैठकीत सर्वाना विश्वासात घेऊन नियोजन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रांत गोविंद शिंदे यांनी दिले.

आळंदी नगरपरिषद सभागृहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारी नियोजन पूर्व तयारी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रांत गोविंद शिंदे होते. याप्रसंगी उपस्थित विविध शासकीय खात्यांचे विभाग प्रमुख, प्रतिनिधी, पदाधीकारी, नागरिक यांच्या सूचना जाणून घेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या प्रसंगी पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे, खेड तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वैभव शिंगारे, वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार, आळंदी देवस्थानचे विश्वस्त विधीतज्ञ विकास ढगे पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, भैरवनाथ उत्सव कमेटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके, आळंदी नगरपरिषद विभाग प्रमुख सचिन गायकवाड, संजय गिरमे, किशोर तरकासे, देवश्री कुदळे, अक्षयकुमार शिरगिरे, कविता भालचीम, वीज वितरण साहेब धापसे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता, सुरक्षा, नागरी सुविधा देण्यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आढावा घेतला. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान आळंदी मंदिरातून ११ जून रोजी होत आहे. प्रस्थान काळात पुरेशा प्रमाणात पाणी, वीज पुरवठा करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. इंद्रायणी नदीत देखील वरील धरणातून पाणी सोडले जाईल. देवस्थानच्या विश्वस्तांनी मांडलेल्या मुद्यांबाबत सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, आळंदीत मागील वर्षीचे प्रस्थान सोहळ्यास प्रचंड विलंब आणि मंदिरा बाहेर गर्दीने चेंगरा चेंगरी झाली होती. ही आठवण करून देत यावेळी दुर्घटना घडली नाही. मात्र मांढरदेव गड यात्रा दुर्घटना लक्षांत घेता पुढील काळात अशी दुर्घटना घडू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. माऊली मंदिराचे क्षेत्रफळाचा विचार करता मंदिरात होणारी गर्दी प्रचंड असते. यासाठी मंदिरात दिंड्यातील भाविक, वारकरी यांच्या संख्येवर बंधने आवश्यक असल्याचे यावेळी पोलीस प्रशासना कडून सांगण्यात आले. या संदर्भात मागील वर्षीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. यामुळे आळंदी देवस्थान, दिंडीकरी आणि संबंधित यांची स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना यावेळी प्रांत गोविंद शिंदे यांनी दिल्या.

यावेळी चर्चेत भाग घेताना वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी वाहन पास चा गैरवापर न करण्याचे आवाहन केले. या बाबत दोषी पास धारकांवर गुन्हे दाखल केले जातील. देहू फाटा येथील रस्त्याची दुरावस्था दूर करण्याची मागणी केली. रस्त्यात विद्युत खांबांचा अडथळा असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या भागात फुटपाथवर अतिक्रमण असल्याने नगरपरिषदेने तात्काळ काढण्याची गरज असल्याचे सांगितले. आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी ही मंदिरात गर्दीवर नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले.

आळंदी देवस्थान चे विश्वस्त विकास ढगे पाटील म्हणाले, मागील वर्षी दर्शन बारीस जागा उशिरा मिळाल्याने काही त्रुटी राहिल्या. यावर्षी जागा लवकर मिळाल्यास प्रभावी दर्शन बारी उभी करता येईल असे सांगितले. आळंदी मंदिरात दिंड्यांचे प्रवेश होताना दिंडीकरी यांचे संख्येवर नियंत्रण आणण्यास प्राप्त सूचना प्रमाणे बैठक घेण्यात येईल.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, मागील वेलीचे अनुदान अजून प्राप्त झाले नाही. अनेक बिले अदा करावयाची आहेत. देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्यास शासन निधी देत नाही. यामुळे न .पा. फंड कमी पडतो. भविष्यात देखभाल दुरुस्ती सह पाच वर्षे कालावधीसाठी संबंधित यंत्रणेस काम देण्यात येईल.
यात्रा पूर्व काळात आळंदीतील प्रदक्षिणामार्ग अतिक्रमण मुक्त राहील यासाठी नियोजन करून प्रदक्षिणा मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्यात येईल असे केंद्रे यांनी सांगितले.

गेल्या वर्षीचे यात्रा अनुदान अद्याप पर्यंत मिळाले नसल्याचे या बैठकीत उघड झाले. यावेळी साधी जेवणाची बिले देखील देता आली नसल्याने जुन्याच संबंधित ठेकेदारा कडून पुढील कामे करून घ्यावी लागणार असल्याचे सांगत यासाठी प्रशासकीय कामकाज सुरु करण्यात आल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी बैठकीत सांगितले.

प्रांत गोविंद शिंदे यांनी विविध विभाग प्रमुख आणि उपस्थित पदाधिकारी, सेवाभावी संस्थानचे पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधत त्यांचे म्हणने एकूण घेत राज्य परिसरातून आषाढी वारीस येणाऱ्या वारकरी भाविकांसह नागरिकांना प्रभावी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित विभागणी काळजीपूर्वक कामकाज करून पुढील बैठकीत अंतिम आढावा घेतला जाईल असे सांगितले. यात्रा काळात कोणाला गैरसोयीस सामोरे जावे लागू नये यासाठी दक्षता घेण्याचे सूचना देत यात दोषींवर गुन्हे दाखल केले जातील असा खणखणित इशारा दिला.

आळंदी प्रस्थान काळात संवाद साधून नियोजन प्रभावी होण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवून भाविक, नागरिकांना सर्व सेवा सुविधा, अडचणी नियंत्रण कक्षातून मार्गी लावण्यात येतील असे प्रांत गोविंद शिंदे यांनी जाहीर केले. माऊली मंदिरात प्रस्थान दिनी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आळंदी देवस्थानने संबंधित यंत्रणांची दिंडी प्रमुखांची स्वतंत्र बैठकीत सर्वाना विश्वासात घेऊन नियोजन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रांत गोविंद शिंदे यांनी दिले. यासाठी दिंडीकरी, दिंडी प्रमुख, चालक, मालक, व्यवस्थापक, सर्व संबंधित दिंड्यांचे चोपदार, पालखी सोहळा मालक यांची बैठक घेण्यास सांगितले. यासाठी शक्य असेल तर दर वर्षी रोटेशनने दिंडीतील वारकरी, भाविक यांना मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यास देवस्थानला दिल्या. वारी सोहळ्याचे अगोदर तसेच पुण्याचे पालक मंत्री यांच्या समवेत देखील यासाठी बैठक होईल असे प्रांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रें म्हणाले, सीसीटीव्हि यंत्रणा कायम स्वरूपी बसविण्याची मागणी आहे. मात्र हे काम तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास योजनेत आहे. नियोजन विभागाचे माध्यमातून ते होणार आहे. तूर्त धोरणात्मक निर्णय कामाची निकड लक्षात घेऊन पालखी सोहळ्यास पूर्वी प्रमाणे नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेपासून सीसीटीव्हि यंत्रणा भाड्याने न घेता कायम स्वरूपी प्रभावी पणे विकसित केली जाईल. यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, तीर्थक्षेत्र आळंदीतील सुरक्षितते साठी कायम स्वरूपी आणि मोठ्या स्क्रीनसह सीसीटीव्हि यंत्रणा विकसित व्हावी. भाड्याने घेऊ नयेत.

मागील वर्षी माऊली मंदिरात श्रींचे प्रस्थान सोहळयास प्रचंड विलंब झाला. या प्रकरणी यावर्षी सोहळ्यास विलंब होवू नये याची दक्षता आळंदी देवस्थानने घ्यावी अशी सूचना करीत या संदर्भात त्रुटी दूर करण्यास आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. या बाबत प्रांत गोविंद शिंदे यांनी ही त्यांचे समारोपात दखल घेतली. प्रस्थान सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी झालेल्या बैठकीचे चर्चेत माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पत्रकार महादेव पाखरे यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित विविध विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांच्या खात्यांचे माध्यमातून करणाऱ्या नियोजनाची माहिती देत संवाद साधला. विविध त्रुटी दूर करण्यासाठी आळंदी जनहित फाऊंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी प्रांत गोविंद शिंदे यांना निवेदन देवून लक्ष वेधले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय