राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक
शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर लोकार्पण आणि श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्यासाठी देशभरात दिवाळी-उत्सव साजरा केला जात आहे. असे असताना विघ्नसंतुष्ट लोकांकडून तमाम हिंदूंचे आदर्श व श्रद्धस्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन शुभकार्यात ‘मिठाचा खडा’ टाकण्याचे काम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड करीत आहेत,अशी घणाघाती टीका भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.
‘‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून शाकाहार थोपवला जात आहे.१४ वर्षे जंगलात राहणारा राम शिकार करायचा.रामाने १४ वर्षे वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो?’’ अशी वादग्रस्त मुक्ताफळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उधळली.त्याविरोधात शहर भाजपाच्या वतीने आक्रमक भूमिका घेताना जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,पिंपरी येथे आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे,पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे,वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे,उपाध्यक्ष सिद्धेश्वर बारणे,आशा काळे,रवी देशपांडे,विनोद मालू,सरचिटणीस संजय मंगोडेकर,शैला मोळक,नामदेव ढाके,महिला मोर्च्याच्या सरचिटणीस वैशाली खाडये,युवा मोर्च्याचे अध्यक्ष तुषार हिंगे,माजी नगरासेविका योगिता नागरगोजे, प्रमोद ताम्हणकर, बाळासाहेब भुंडे,कार्यकारिणी सदस्य गणेश वाळुंजकर, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर,संतोष तापकीर,रवी नांदुरकर, बाबर,प्रसाद कस्पटे,सोमनाथ भोंडवे,क्रीडा प्रकोष्ठचे जयदीप खापरे,अभियंता सेलचे दीपक भंडारी, पंचायतराजचे अभिजित बोरसे, उत्तर भारतीय आघाडी प्रमुख आकाश भारती,भटके विमुक्तचे गणेश ढाकणे,कायदा सेलचे ऍड.गोरखनाथ झोळ,ऍड.दत्ता झुळूक,कामगार आघाडीचे अध्यक्ष नामदेव पवार,सामाजिक कार्यकर्ते समीर जवळकर,युवराज ढोरे,रणजित कलाटे,सीमा चव्हाण,मंगेश नढे,मुकेश चुडासामा, दीपक नागरगोजे, शिवम डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे सातत्याने सनातन धर्मावर टीका करतात. सनातन धर्मावर टीका करून कुणाची खुष्मस्कारी करतात, हे वेगळे सांगायची गरज नाही. मुद्दाम सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्ये करणे, त्यातून वाद निर्माण करणे, समाज-समाजामध्ये तणाव वाढविताना आपली पोळी भाजून घेणे यासाठीच जितेंद्र आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा अशी निराधार वक्तव्ये त्यांना भोवली आहेत. काल तोडलेले अकलेचे तारे हेच त्यांच्या निकृष्ट विचारधारेचे प्रतिक आहे. त्यामुळे आपली विचारधारा आपल्या जवळच ठेवावी, आमच्या आराध्यांविषयी बेताल वक्तव्ये करू नये, अन्यथा त्यांना आमच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागेल, असा थेट इशारा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला.
विकृत विचारसरणीला वेळीच लगाम घातला
भव्य राममंदिराचे निर्माण होत असताना, अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करून आमच्या भावना दुखाविण्याचे दुष्कर्म जितेंद्र आव्हाड सातत्याने करत आहेत. प्रत्येक वेळेस अशा प्रकाराची वादग्रस्त वक्तव्ये करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांवर महाविकास आघाडीचे नेते देखील मौन बाळगून आहेत. भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्याबाबत बेताल बोलणे, अशा विकृत विचारसरणीला वेळीच लगाम घातला पाहिजे.
शंकर जगताप, भाजपा, शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड