Friday, November 22, 2024
Homeग्रामीणरोजगारासाठी ४०-५० किलोमीटर दूर जाणाऱ्या आदिवासी भागातील नागरिकांना मिळाला गावातच रोजगार

रोजगारासाठी ४०-५० किलोमीटर दूर जाणाऱ्या आदिवासी भागातील नागरिकांना मिळाला गावातच रोजगार

जुन्नर  :- कोरोना महामारीमुळे देश लॉकडाऊन केला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून अनेक नागरिकांच्या हाताला कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. आणि भविष्यातही रोजगार मिळण्याची शक्यता नसल्यामुळे हातविज ग्रामपंचायतीने मनरेगा योजने अंतर्गत वृक्ष लागवडीची कामे चालू केली आहेत.

या गावामधील नागरिकांना चार महिन्यांची शेतीची कामे संपल्यावर इतर दिवस कोणत्याही प्रकारचा रोजगार गाव पातळीवर उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत त्यांना रोजगारासाठी ४० ते ४५ किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या पूर्व भागात मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत असते. आता सध्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर आज हातविज गावात रोजगार हमी अंतर्गत कामाला सुरुवात केली. गावच्या सरपंच भागुबाई पांडुरंग पारधी यांच्या हस्ते उद्घाटन करून मनरेगा योजने अंतर्गत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यास सुरुवात करण्यात आली.

जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रोजगार हमीची कामे तातडीने सुरु करावीत यासाठी किसान सभा संघटनेने जिल्हा परिषद आणि पंचायत प्रशासनाकडे सातत्याने मागणी केलेली होती. संघटनेच्या या मागणीला पुणे जिल्हा परिषदेने सकारात्मक प्रतिसाद देऊन मजुरांना गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन कामाची मागणी नोंदविण्यासाठी सांगितले होते. हातविज गावामध्ये रेंज नसल्यामुळे आणि फाॕर्मबाबत माहीती नसल्यामुळे मजुरांना ऑनलाईन कामाची मागणी करता आली नाही. याबाबत गटविकास अधिकारी जुन्नर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संपर्काची साधने नसल्यामुळे ज्या गावांमधून ऑनलाईन कामाची मागणी नोंदविली नाही. अशा गावांमध्ये प्रशासनाने पुढाकार घेऊन मजुरांकडून लेखी मागणी नोंदवावी आणि ताबडतोब कामे चालू करण्याची मागणी केली होती.

या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. मनरेगा अंतर्गत कामे चालू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, त्यामुळे मजुरांकडून अजून पुढील अडीच महिने कामाची मागणी करण्यात येत आहे.

या वेळी मनरेगा योजनेची माहिती देण्यासाठी आणि उपस्थित मजुरांना, ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभा पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे तालुका संघटक गणपत घोडे, आदिवासी अधिकार मंचाचे प्रा. ज्ञानेश्वर सावळे, हातविज गावच्या सरपंच भागुबाई पांडुरंग पारधी, ग्रामपंचायत आंबेचे सरपंच मुकुंद घोडे, बिरसा मुंडा वन धन केंद्राचे अध्यक्ष गोविंद निर्मळ, ग्रामसेवक गवारी भाऊसाहेब, रोजगार सेवक अक्षय निर्मळ आदींसह मजुर ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टंटचे पालन करत उपस्थितीत होते.

संबंधित लेख

लोकप्रिय