Friday, May 10, 2024
Homeग्रामीणकेंद्र सरकार अपयश झाकण्यासाठी कोरोनात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतंय; समाजवादी प्रबोधनीच्या...

केंद्र सरकार अपयश झाकण्यासाठी कोरोनात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतंय; समाजवादी प्रबोधनीच्या चर्चासत्रातील सूर

इचलकरंजी(प्रतिनिधी):- मोदींच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सरकारने आपल्या कारभाराचे पहिले वर्ष पूर्ण केले. भारत गेली सहा वर्षे मोदींच्याच धोरणातून वाटचाल सुरु आहे. पण यात त्यांनीच केलेल्या भय,भूक भ्रष्टाचार नष्ट करणे, नोटबंदीचे पन्नास दिवसात दिसणारे फायदे, जीएसटीची सुलभीकरण करपद्धती, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती, सबका साथ सबका विकास अशी लोकप्रिय घोषणा, विकासमापन पद्धती बदलूनही तो का दिसत नाही. यावर सत्ताधारी व सत्ताधार्जिणा वर्ग काहीही बोलत नाही..कोरोना येण्यापूर्वीच  गंभीर प्रश्न तयार झाले होते पण आता सारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अपयश  कोरोनावर ढकलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीमागील वास्तव आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्ता चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आले.

            ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांचा ‘उलथापाल थिंच वर्ष ‘ या लेखावर आधारित हे चर्चासत्र होते. या चर्चासत्रातील विविध वक्त्यांनी असे मत मांडले की, गेली ६ वर्षे मा.पंतप्रधानांच्या एकमुखी नेतृत्वाखाली  भारतीय राजकारण, अर्थकारण, सत्ताकारण आकार घेत आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या भल्या बुऱ्या परिणामांची जबाबदारीही त्यांचीच आहे. ते उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्सव प्रिय आहेत ,प्रसिद्धची कोणतीही संधी न सोडणारे आहेत, त्यांचे स्वफोकस तंत्र लाजबाब आहे यात कोणालाच शंका नाही. गेल्या सहा वर्षांत भारताने जो विकास केला. त्यामुळे कोरोना आपत्तीतही आपण ढासळलो नाही, अशा आशयाचे विधानही त्यांनी केले.फक्त त्या विकासाची उदाहरणे मात्र टाळली. इथेच तर खरी गोम आहे.गेल्या सहा वर्षात नेमका कुणाचा,किती विकास  झाला ?याबद्दल कोणीच  बोलत नाही. वास्तविक  ठरवलेले धोरण आणि आणि त्याचे योग्य उत्तरदायित्व याबाबत मोदीजी गेल्या ५ वर्षात किंवा गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही यशस्वी ठरले आहेतच असे म्हणता येत नाही . गुजरात मॉडेलचे गौरविकरण किती चुकीचे आहे, हे अगदी कोरोनाच्या आपत्तीतही स्पष्ट झाले आहे.

            या चर्चासत्रात असेही मत व्यक्त झाले की, गुजरात  राज्य असो भारत देश असो मोदींंच्या नेतृत्वाच्या कार्यकाळात फार वेगळी अशी काही घवघवीत प्रगती करू शकला असे म्हणता येणे अवघड आहे. कारण प्रगतीचा आलेख व आकडेवारी तसं काहीही दाखवत नाही. विकास वाचेतुन नव्हे तर धोरणातून दिसावा लागतो. तो दिसत नाही म्हणून तर  निवडणुकाही जमिनीवरील वास्तवापेक्षा भावनिक पातळीवर नेऊन,पाकिस्तानचे भूत उभे करून,धार्मिक ध्रुवीकरण करून, ताजे व नवे प्रश्न उपस्थित वा निर्माण करून लढवाव्या लागतात हा इतिहास व वर्तमानही आहे.जर कोरोनाचे संकट आपल्याला संधी घेऊन आले असेल तर गेल्या सहा वर्षात आपण काय केले  ?याचाही विचार करावा लागेल. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेच्या संधीचे कसे सोने केले ? हे उदाहरणांसह  सांगावे लागेल. एकतर्फी  लादलेले निर्णय योग्य असते, देशाला बलशाली करणारे असते तर  ‘आत्मनिर्भर भारत’अशी घोषणा नव्याने करावी लागली नसती .अशी घोषणा करावी लागणे यातच परावलंबीत्वाचा एक छूपी जाणीव आहे .त्यामुळे पुढील चार वर्षांचा कालखंड केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे खरे प्रश्न सोडविण्यासाठी,जी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. त्याची पूर्तता करण्यासाठी राबवला पाहिजे ही भारतीय जनतेची मागणी आहे.

              या चर्चासत्रात लॉक डाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सर्वश्री  प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, राजन मुठाणे, दयानंद लिपारे, अन्वर पटेल, धनंजय सागावकर, मनोहर जोशी,.देवदत्त कुंभार, शकील मुल्ला, बापूसाहेब भोसले, सचिन पाटोळे, प्रशांत लोले, दत्तात्रय मुसळे, शंकरराव भांबिष्ट्ये, आनंद जाधव आदींनी सहभाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय