Monday, May 20, 2024
Homeग्रामीणअंगणवाडी सेविकेची पोषण आहारात अफरातफर

अंगणवाडी सेविकेची पोषण आहारात अफरातफर

 

अंगणवाडी सेविकेची पोषण आहारात अफरातफर

सेविकेवर कठोर कारवाईसाठी माता-पालकांचे प्रशासनाला निवेदन 

वडवणी :- (प्रतिनिधी) 

        वडवणी नगरपंचायत अंतर्गत असलेल्या बिचकूलदरा तांडा याठिकाणी अंगणवाडी केंद्र अस्तित्वात असून तेथील कार्यरत अंगणवाडी सेविका शालन गोविंद राठोड यांनी लहान बालकांसाठी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असल्याची लेखी तक्रार स्थानिक माता-पालक यांनी वडवणी तसेच बीड प्रशासनाकडे केली असून बालकांच्या तोंडाचा घास हिरावून घेणाऱ्या त्या भ्रष्टाचारी अंगणवाडी सेविकेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. 

                     माता-पालक यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, वडवणी नगरपंचायत अंतर्गत असलेल्या बिचकूलदरा तांडा याठिकाणी लहान बालकांसाठी अंगणवाडी केंद्र अस्तित्वात असून याठिकाणी सदर अंगणवाडी केंद्रात शालन गोविंद राठोड या अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे व सततच्या हेराफेरीला बिचकूलदरा तांडा येथील ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत. या अंगणवाडी केंद्रात खूपच अनियमितता असून सदर सेविका ह्या आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करतात. याठिकाणी मदतनीस पद देखील रिक्त असून वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अंगणवाडी कारभाराचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. माहे एप्रिल-मे २०२० या कालावधीसाठी वयोगट ६ महिने ते ३ वर्षाच्या बालकांसाठी शासनाकडून पोषण आहार पाकिटांचे या अंगणवाडी केंद्राला पुरविण्यात आलेले होते. मात्र सदरील सेविकेने हा पोषण आहार प्रत्येक लाभार्थ्यास नियमाप्रमाणे वाटप न करता यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केलेली असून प्रत्येक बालक लाभार्थ्यास गहू २, हरभरा ४, हळद १, मीठ १, तेल १, तिखट १ असे एकूण १० पॉकेट देणे बंधनकारक असताना सदर सेविकेने मात्र काही लाभार्थ्यास तोंड पाहून कोणास ८ तर कोणास ९ पॉकेट वाटप करून उर्वरित पोषण आहारात गफळा करून भ्रष्टाचार केला आहे. परिणामी शासनालाही फसविण्याचे काम यातून झाले आहे. याबाबत पोषण आहार वाटप होत असताना बिचकूलदरा तांडा येथील काही पालकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी वडवणी यांना दूरध्वनीद्वारे याची चौकशी केली असता त्यांनी प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून प्रत्येक लाभार्थ्यास १० पॉकिट वाटप करणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. परंतु येथील अंगणवाडी सेविकेला विचारले असता त्यांनी केवळ ८ व ९ पॉकिटच वरून आले असल्याचे सांगितले व पोषण आहार वाटप करण्याअगोदरच तेथील माता पालकांच्या १० पॉकेट मिळाले म्हणून सह्या घेतल्या. याअगोदर मागील अनेक वर्षांपासून पोषण आहारात मोठ्या प्रमाणात हेराफेरी व भ्रष्टाचार झाल्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने या प्रकरणी तातडीने निपक्ष चौकशी करून अचानकपणे अंगणवाडी केंद्रात येऊन सर्व मातांना बोलावून घेत तेथील स्पॉट पंचनामा करावा व दोषींवर सेवा समाप्तीची कठोर कारवाई करून या ठिकाणी चांगल्या व प्रामाणिक अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करावी. येत्या आठ दिवसात याप्रकरणी उचित कार्यवाही करावी अन्यथा सर्व माता-पालक ग्रामस्थांसह बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय वडवणी जि.बीड याठिकाणी बेमुदत आमरण उपोषणास बसणार असून उपोषणादरम्यान या सध्याच्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर निवेदनकर्त्यांच्या जिवीतास काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा तेथील माता पालक व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सौ.शिवकन्या विजय राठोड, सौ.कल्पना नवनाथ राठोड, सौ.पूजा संतोष राठोड, सौ.वैशाली बाळू राठोड, सौ.कविता बाळू चव्हाण, सौ.सविता शरद चव्हाण, परमेश्वर गुलाब राठोड, राजेभाऊ किसन चव्हाण, आकाश शेषराव राठोड यासह आदींच्या स्वाक्षऱ्या असून या लिखित निवेदनाच्या प्रत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, महिला व बालकल्याण सभापती बीड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास प्रकल्प विभाग बीड, बालविकास प्रकल्प अधिकारी वडवणी यांना देण्यात आले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय