Saturday, April 27, 2024
Homeविशेष लेखभूकेसाठी शेती आणि बंद औद्योगिकीकरण करेल मानवजातीचे रक्षण

भूकेसाठी शेती आणि बंद औद्योगिकीकरण करेल मानवजातीचे रक्षण

एका अनिश्चित नाजुक काळात जग शिरले आहे. लाॅकडाऊन उठवला तर कोरोनाचा प्रसार होऊन मानवजातीच्या जीवावर बेतेल आणि चालू ठेवला तर अर्थव्यवस्था मोडेल असा अभूतपूर्व पेच आहे.

लाखो माणसांनी मुख्यत्वे श्रमजीवी मजूर वर्गाने शहरे सोडून, जीवावर उदार होऊन, आहे त्या स्थितीत गावाकडे पायी कूच केले. शहरे ही

परावलंबी, बांडगुळी व्यवस्था या समस्येत पूर्ण उघडी पडली. शहरं जगवतात हा भ्रमाचा भोपळा फुटला. 

शहर ही कृत्रिम व्यवस्था पूर्णपणे गावांवर म्हणजे पृथ्वीच्या अन्न देण्याच्या क्षमतेवर जगते. आज जे पाणी व वीज शहरांना मिळत आहे ते देखील गावं व पृथ्वी स्वतःची आहुती देऊन पुरवत आहेत.

युरोप, अमेरिकेत दोन अडिचशे वर्षे व  आपल्या देशात  सुमारे साठ ते दीडशे वर्षे कृत्रिम मानवी व्यवस्थेने जीवनाच्या अस्सल व्यवस्थेला वेठीस धरले होते. शेवटी आदिम काळातील, पृथ्वीच्या जीवन सुरू करणाऱ्या प्रतिनिधिने उन्मत्त झालेल्या मानवाला जेरबंद करून जीवसृष्टीच्या मुक्तीचा मार्ग दाखवला. सरकारकडे पैसे नाहीत. तरी ‘येन केन प्रकारेण’ पैसा उभा करून, तो खेळवुन, जगण्याचा देखावा ते पुन्हा सुरू करू इच्छिते. जनता खरेदी करू लागेल व पुन्हा अर्थव्यवस्था रूळावर येईल असे मानले जाते. यावर सर्वच देशांतील सर्व राजकारण्यांचा विश्वास आहे. कसली खरेदी, तर जीवनाला ज्यांची काहीच गरज नाही, हे लाॅकडाऊनच्या परिक्षा घेणाऱ्या काळात सिध्द झाले त्या औद्योगिक उत्पादनांची. म्हणजे तेच औद्योगिकरण, कोरोना, कॅन्सर, तापमानवाढीचे दुष्ट चक्र पुन्हा सुरू करायचे. तेही कोरोना नियंत्रणात आला नसताना. का? तर कृत्रिम अर्थव्यवस्था मोडू नये म्हणून. जीवन मोडले तरी चालेल. ही भ्रमिष्टावस्था आहे.

लाॅकडाऊनमुळे माणसे बेजार आहेत असे म्हटले जाते. पण लाॅकडाऊन कुणाला आहे. तर खऱ्या अर्थाने औद्योगिक शहरांना, यंत्राला, जीडीपी वाढीला आहे. माणसाला प्राणिमात्र म्हणून नाही. 

काँम्प्युटरची भाषा जाणणाऱ्या माणसाला जर निसर्गाच्या भाषेचा कान असता तर हा आपला पूर्वज काय सांगतो हे समजले असते.

कोरोना विषाणु व प्रचंड ‘अम्फान’ वादळ, या आपत्ती प्रस्थापित मानवी जगाने निर्माण केल्या. पण उत्तर शोधण्याच्या दृष्टीने रूढ मानवी आकलनापलिकडचा विचार करावा लागेल.

या समस्येतुन फक्त पृथ्वीशी अजून नाळ जोडलेला शेतकरीच मार्ग काढू शकतो. जी जगाची सूत्रे, पृथ्वीशी संबंध नसलेल्या नेते, नोकरशहा, उद्योगपती, बँकर्स, अर्थतज्ञ, तंत्रज्ञ यांच्या हाती आहेत, ती सूत्रे पृथ्वीच्या अन्न म्हणजेच ऊर्जानिर्माणात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हाती घ्यावी. खरेतर या सर्वांनी ती स्वतःहून त्याच्या हाती द्यावी. 

याचा अर्थ रूढ अर्थाने सत्ता हाती घ्यावी असा नाही. सत्ता तर आता उत्तरोत्तर क्षीण व निःष्प्रभ होत जाणार आहेत. येत्या तीन चार वर्षांत जगभर सत्ता ही संकल्पनाच इतिहासजमा होणार आहे. सरकारे व सत्ता कोसळतील. ज्या व्यवस्थेत या सत्ता निर्माण झाल्या व काम करत होत्या ती व्यवस्थाच उरणार नाही.

आधुनिक मानवी व्यवस्था एका जीवजातीतल्या काहींची कृत्रिम व्यवस्था आहे. आतापर्यंत जसे ती खऱ्या नैसर्गिक व्यवस्थेला वाकवत राहिली तसे यापुढे चालणार नाही. विज्ञान व प्रबोधनयुगाची, पुरोगामित्वाची, तंत्रज्ञानाशी व आर्थिक वाढीशी सांगड घालणे ही चूक झाली. विवेकानंदांची जागृती,  देशाचा स्वातंत्र्यलढा, गांधीजींचा सत्याग्रह, औद्योगिकरण व अर्थव्यवस्थेसाठी झाला नव्हता. ते त्याचे कधीच उद्दिष्ट नव्हते. 

जेव्हा या धरतीची लेकरं रणरणत्या उन्हात अनवाणी  १२००, १४००, २००० किमी चालत निघाली, तेव्हा या देशाचा आत्मा तळमळला. अमानुष प्रगती व विकासाची वास्तविकता उघड झाली. राष्ट्रपिता, ‘गावालाच घटक माना’, असे का म्हणाले ते स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या गावांनी श्रमिकांच्या या  ग्रामयात्रेला अन्नपाणी पुरवले. परवा वाचले, एका रिक्षावाल्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी, कष्टाने जमवलेले दोन लाख रूपये या मजुरांना अन्नासाठी दिले.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगुनही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धान्य देण्यास नकार देणारी ही अर्थव्यवस्था, पूर्ण मानवजातीवर संकट आले असूनही आजही तशीच संवेदनाशून्य आहे. (१७५६ ला यंत्र आले.) १७७६ ला ‘वेल्थ आॅफ द नेशन्स’ हे अर्थव्यवस्थेचे पायाभूत पुस्तक आल्यापासुन ती तशीच आहे. आत्महत्या करणारे शेतकरी आणि हे मजूर जात्यात आहेत. 

पण त्यांना कोरड्या तटस्थपणे पाहणारे सुपात आहेत व या अर्थव्यवस्थेच्या जात्यात काही वर्षांत जाणार आहेत. युरोप अमेरिकेत त्याची सुरवात झाली आहे.

 या जात्यात सगळी मानवजात व जीवसृष्टी भरडली जाण्याच्या आत शेतकऱ्याने ताठ उभे राहिले पाहिजे. शाश्वत संस्कृती देणारे भारतीयत्व जागवले पाहिजे. सत्ता व सरकारांचा बाऊ करण्याची गरज नाही. त्यांचे काम फक्त राज्यकारभार करणे आहे. कुणी आयुष्य कसे जगायचे हे ठरवणे नाही, की जीवनाचे नियंत्रण करणे नाही. ते तर निसर्ग करतो, पृथ्वी करते. औद्योगिकरण व अर्थव्यवस्था नव्हती, त्या दहा हजार वर्षांच्या शेतीयुगात, त्यापूर्वी लाखो वर्षे, माणसाच्या उत्क्रांतीत व प्राणिमात्र म्हणून करोडो वर्षे, ती करत होती. तिचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांनी परिस्थितीचा लगाम हातात घेतला पाहिजे. 

निसर्गाची व जीवनाची नाळ तुटलेली व्यवस्था व माणसे ही परिस्थिती हाताळू शकणार नाहीत. कारण ही व्यवस्था चुकीची असूनही ज्यामुळे टिकली होती ते पृथ्वीने दिलेल्या स्थैर्याचे गृहितक यांनीच मोडले आहे.

निसर्गरूपी महादेवाचे वादळे, अवकाळी, बर्फवृष्टी, उष्णतेच्या लाटांचे विनाशकारी रौद्र तांडव सुरू झाले आहे. त्याला भूमिपुत्र शेतकरीच शांत करू शकतो. ‘शेती’, ही प्रमाद करणाऱ्या मानवजातीच्या वतीने क्षमायाचना करणारी ‘प्रार्थना’ आहे. त्यात सर्वसमर्पण आहे. तशी क्षमता असणारा शेतकरी अजून पूर्वेकडील देशांत आहे. एक तत्वज्ञान म्हणून शेती जगलेला शेतकरी, भारतात दहा हजार वर्षे होता. तो भुकेसाठी अन्न पिकवत होता. सृष्टीचा नियम पाळत होता. बियाणे, धान्य विकत नव्हता. तोच शाश्वत भारत होता. गेल्या साठ वर्षांत तुटलेला हा धागा पुन्हा जोडण्याची गरज आहे. ते भारतात होऊ शकते. भारत जगाला वाचवू शकतो. अस्तित्व रक्षणाची दिशा देऊ शकतो.

तापमानवाढीमुळे बंगालच्या उपसागरातील पाणी प्रमाणाबाहेर तापले. त्यामुळे सुमारे २५० किमी प्रति तास वेगाचे ‘अम्फान’ वादळ उठले. या वादळाचा विस्तार एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत सुमारे २८८० किमी म्हणजे जवळजवळ युरोप एवढा होता. या वादळाने भारत व बांगला देशाला झोडपले. कलकत्ता शहरात मोठी हानी केली. शहरे, या दुर्घटनेला फक्त ‘वित्तहानी’ व फारतर ‘जिवितहानी’ म्हणून पाहतात. पण नैसर्गिक दुर्घटनांचा खरा एकत्रित समग्र परिणाम शेतकरी प्रत्यक्ष झेलतो. तोच पिकवणारा असल्याने जे अनुभवतो व पृथ्वीचे सृजन धोक्यात आल्याची  जी जाणीव त्याला होते, ती जाणीव, या संकटाला जबाबदार असणाऱ्या शहरांना नाही. ती दुसरीकडून अन्न खेचतात व त्यांच्या प्रभावामुळे सर्व काही आलबेल आहे असा भास तयार केला जातो.

शेतकरी व आता मच्छीमारही आपत्तींबद्दल नुकसानभरपाई मागतात. त्यांना पॅकेज दिले जाते. हा अर्थव्यवस्थेतील पैशाचा छोटा हिस्सा आहे. पण मोठा हिस्सा याच आपत्ती आणणाऱ्या उद्योगांच्या, नोकरी- धंद्यांच्या निर्मितीसाठी खर्च होतो. त्यामुळे, ज्यामुळे अवकाळी, वादळे व इतर आपत्ती येतात, ज्यामुळे मासळी जाते, ती प्रक्रिया विकासाशी जोडली असल्याने, अधिक वेग घेते.  म्हणून आपत्तीनिवारणाचा खर्च वाढत जात आहे. दोन चार वर्षांत ना अन्न ना मासा व ना उद्योग ना नोकरी अशी स्थिती येईल. अन्न व मासा निवडुन, जगवण्याचा भास निर्माण करणारा उद्योग, धंदा व नोकरी आताच बंद करावी. या मायावी जगातून परत फिरण्याची संधी या वर्षीच आहे.

तथाकथित आधुनिक मानवी व्यवस्था ही एका जीवजातीतल्या काही जणांची कृत्रिम व्यवस्था आहे. ती पृथ्वीच्या व्यवस्थेला वाकवत राहिली. हे आता थांबवावे. 

राॅथशील्ड, राॅकफेलर, फोर्ड, बिल गेटस, बेझाॅस व त्यांच्या भारतीय छोट्या आवृत्त्यांची कौतुकं आता पुरे झाली. यांचे पैसे यांना स्वतःला जगवत नाहीत. पृथ्वी जगवते. निसर्ग, पाऊस पाडण्याचे व पृथ्वी, अन्न पिकवण्याचे कुणाकडून पैसे घेत नाही.

 यांच्या प्रभावामुळे जगभरातील प्रसारमाध्यमे मानवजातीला अज्ञान, अंधारात ठेवून विनाशाकडे ढकलत आहेत. यांच्यापैकी एकालाही पृथ्वीचे तापमान किती वेगाने वाढत आहे हे सांगता येणार नाही. काहीजणांना वाटते की, यांना माहीत असून ते असे बेपर्वा वागतात. तर मग ही गोष्ट अधिक गंभीर आहे. याचा अर्थ एकप्रकारच्या मनोरूग्णावस्थेत गेल्याने ते मानवजातीला नष्ट करत आहेत.

आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना व पुढील पिढ्यांना वाचवण्यासाठी काही माहिती प्रत्येकाला असणे आवश्‍यक आहे. नाहीतर, पृथ्वीचे काही सांगु नका, आम्ही जगायचे कसे ते सांगा? असं म्हणणारांच्या घरात आता संकट शिरले. दार बंद करून बसायची वेळ सर्वांवर आली. मी आता काही माहिती देत आहे. ती   समजुन घेणे आवश्यक आहे. तर आपण योग्य निष्कर्ष काढू शकू.

१.  जून २०१६ मधे युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा अहवाल आला की सन २०१५ आणि २०१६ च्या पहिल्या अर्ध्या भागात पृथ्वीच्या सरासरी तापमानात

०. २४° से ची स्फोटक वाढ झाली. सन २०१५-१६ म्हणजे पाच वर्षांपासुन पृथ्वीच्या सरासरी तापमानात वर्षाला ०.२०°से अशी महाविस्फोटक वाढ सुरू झाली आहे.

२.  ऑगस्ट २०१६ मधे जागतिक हवामान संघटनेचा अहवाल म्हणतो की, तापमानवाढीमुळे पर्यावरणीय पट्टे ( climate zone ) दर वर्षी ३५ मैल, या भयंकर गतीने विषुववृत्तापासून ध्रुवांकडे सरकू लागले आहेत. या परिस्थितीत जीवजाती  स्वतःला अनुकूल बनवू न शकल्याने झपाट्याने नष्ट होत आहेत. 

३. ६ नोव्हेंबर २०१७ ला बाॅन, जर्मनी येथे झालेल्या युनोच्या खास परिषदेत जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले की, इतका कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणात जमा झाला आहे की, तापमान आता किमान ५० वर्षे वाढत राहणार आहे. तापमानवाढ  अपरिवर्तनीय झाली आहे.  या वायुंचे थोडेही उत्सर्जन आणि त्यांना शोषणाऱ्या व जीवन वाचवणाऱ्या हरितद्रव्याचा थोडाही नाश  होऊन चालणार नाही.

४. मानवजात वाचवण्यासाठी  उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत सरासरी तापमानात होणारी २°से ची वाढ रोखली जावी असे  पॅरिस करार म्हणतो. आपण वर तापमानवाढीची गती पाहिली. याचा अर्थ, डिसेंबर २०१५ मधे  जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन मोठा गाजावाजा करून मानवजात वाचवण्यासाठी पॅरिस येथे केलेला करार  या वर्षी अयशस्वी ठरत आहे.

जागतिक वन्यजीवन निधी व इतर अहवाल म्हणत आहेत की, गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीवरील विविध जीवजातींपैकी ६० ते ९०% जीवजाती मानवी विकासामुळे नष्ट झाल्या आणि सुमारे ९३% जैविक विभागांना हानिकारक धक्का लागला आहे.

सन २००९ चे कार्बन डाय ऑक्साईड वायूचे जागतिक उत्सर्जन १००० कोटी टन होते. ते कमी करायचे होते. त्याऐवजी ऊर्जाग्राही विकासाच्या धुंदीत जनतेला उन्माद आणून २०१८ ला ३८०० कोटी टन केले. यात वाहनांतून सोडलेले,  कोळसा जाळून वीजनिर्मिती व सीमेंट निर्माणाचा वाटा ९४% आहे. फक्त मोटारीचा वाटा ( नलिकेवाटे +निर्मिती+ रस्तेबांधणी ) एकूण उत्सर्जनात ७५% आहे. आताच्या जागतिक हवामान खात्याच्या  अहवालाप्रमाणे २०१० ते २०१९ हे दशक सर्वाधिक उष्ण दशक ठरले आहे. परिणाम विदर्भ, मराठवाडा व इतरत्र दुर्घटना. सध्या दिल्ली पंजाब व हरयाणात  उष्णतेची लाट चालू आहे. तापमान  ४७ °से आहे. ते खरे अडिच- तीन अंश तरी जास्त असते. ब्रिटिशांपासुन चालू  असलेल्या पध्दतीत सावलीत तापमान मोजले जात आहे. 

सुमारे बारा ते पंचवीस हजार वर्षे पृथ्वीचे सरासरी तापमान १५°से असे सुखद होते. मुंबईच्या राजपत्राप्रमाणे १४० वर्षांपूर्वी मुंबईचे तापमान २५°से पेक्षा जास्त होत नव्हते. आता मुंबईत उच्चतम तापमान ४५ °से पर्यंत जाते. ५० वर्षांपूर्वी थंड हवामानाच्या युरोप, अमेरिकेत, केवळ तंत्रज्ञानाने हरखुन जाऊन प्रतिष्ठा, सुख व आरामाच्या चुकीच्या कल्पनेपोटी, पुढील धोका न ओळखुन वातानुकूलन यंत्र ( ए सी ) बसवले जाऊ लागले. त्यांचे आम्ही अनुकरण केले. आज वातानुकूलनासाठी सुमारे ४५% वीज वापरली जाते. देशात ६४% वीज कोळसा जाळून बनवली जात आहे.  रोज त्यासाठी देशात सुमारे १५ लाख टन कोळसा जाळला जातो. सुमारे २३ लाख टन कार्बन डायाॅक्साईड वायू रोज वातावरणात सोडला जातो. ‘नायट्रोजन डायाॅक्साईड’ व इतर वायू, राख, गरम पाणी वेगळे. या वाटचालीमुळे पृथ्वी तापत गेली. ‘ए सी’ पृथ्वीला तापवतो.

पंतप्रधान म्हणतात की, सन २०५० मधे सर्वांची घरे वातानुकूलित असतील. इतर  पक्षांचेही नेते काही वेगळे म्हणाले नसते. सर्वांचे विचार औद्योगिकरण व अर्थव्यवस्थेने घडवले आहेत. त्यांना माहित नाही की असे वागल्याने २०५० मधे मानवजात व जीवसृष्टी नसेल. असलेच तर जिवाणु असतील. गेली काही वर्षे काही भागांत *शेतकरी सकाळी ९ वाजल्यानंतर असह्य उष्णतेमुळे शेतात काम करू शकत नाहीत. माणसे दुपारी बाहेर फिरू शकत नाहीत. माणसाची, प्राणी म्हणून जिवंत राहण्याची मर्यादा ५०°से आहे. पण निर्णय घेणारे एसीत बसले असल्याने त्यांना झळ बसत नाही व पोळणारे वास्तव कळत नाही. आत्ता तातडीने मोटार, एसी व सीमेंट बंद केले पाहिजे. पृथ्वीवर आणिबाणी निर्माण झाली आहे. हे, निर्णय घेणारांना जाणवण्यासाठी देशातील सर्व मंत्रालये व संसदेचे वातानुकूलन बंद ठेवले पाहिजे. 

पृथ्वी ४८० कोटी वर्षांत जीवनासाठी सुयोग्य म्हणजे विकसित झाली होती. आताचे भौतिक विकसित होणे, हे आपले शरीर घडवणाऱ्या त्या प्रदीर्घ जैविक विकासाच्या विरूद्ध आहे. तेव्हा डोंगर, जंगल, माती, सागर, वातावरण, तापमान ही पायाभूत संरचना होती व सजीव सृष्टी हे उत्पादन होते. आताच्या अल्पकालीन निर्जिव विकासात बंदर, विमानतळ, रस्ते, कारखाने इ. पायाभूत संरचना व मोटार, विमान, सीमेंट, स्टील, टीव्ही, काँप्युटर इ. उत्पादनांनी पृथ्वीला उध्वस्त केले. 

स्वतःला विकसित म्हणवणारे देश जगाचे नेतृत्व करत आहेत. यांचे भौतिक, आर्थिक विकसित असणे हीच समस्या आहे. औद्योगिकरण चालू ठेवून, पर्यायी ऊर्जास्त्रोत व तंत्रज्ञान वापरून पॅरिस करार पाळण्याच्या वल्गना ते करत राहिले. पण तसे होणार नाही. भौतिक  विकास व जीवन या दोन दगडांवर पाय ठेवता येणार नाही. जर्मनी, स्वीडन सारख्या काही देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे काही स्वागतार्ह उपाय केल्याने मानवजात वाचणार नाही. प्रश्न पार पलिकडच्या, पृथ्वीच्या दृष्टीकोनातुन केलेल्या उपायाची मागणी करतो. 

आता यांच्यावर विश्वासून राहिल्याने मानवजातीचा व जीवसृष्टीचा लवकरच अंत होणार आहे. जगातल्या उत्सर्जनाचा विचार केला तर औद्योगिक जीवनशैली चालू राहिल्यास फक्त सुमारे तीस वर्षांत मानवजात व बहुतांश जीवसृष्टी नष्ट होईल. ती प्रक्रिया चालू असून अधिकाधिक वेग घेत आहे.

 २५० कोटी वर्षे हरितद्रव्याने शोषलेला व पृथ्वीने कोळसा, तेल व वायुरूपात पोटात रिचवलेला बहुतांश ‘कार्बन डाय ऑक्साईड’ वायू आपण स्वयंचलित यंत्र आणून फक्त २५० वर्षांत बाहेर काढून जाळला आहे. काही माणसे कोळसा, तेल व वायू संपल्यावर काय? याची चिंता करतात. त्यांना वर दिलेली माहिती नसते. खनिज इंधन संपण्याआधी तुम्ही, मानवजात संपणार आहे.

कृत्रिम जग थांबवणे, निसर्ग व पृथ्वीच्या खऱ्या जगात दाखल होणे व एखादे बाळ जसे स्वतःला आईच्या हातात सोपवते तसे त्यांच्या हाती स्वतःला सोपवणे हाच फक्त मानवजात वाचवण्याचा उपाय आहे. उद्योगपूर्व कृषियुगात किंवा जंगलात जाणे  हा तापमानवाढीपासुन आणि कोरोना वा अन्य विषाणु व कॅन्सरपासुनही वाचण्याचा उपाय आहे. अवकाळी, बर्फवृष्टी, वादळे व वाढत्या उष्णतेचा स्पष्ट अनुभव  सागरापासुन दूर असलेल्या व देशात नगदी पिकांची सुरवात करणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांत आधी पावसाने पिके गेली.  पाऊस व गारा पडूनही उष्णता वाढतच आहे. आता उष्णतेने जात आहेत. गेली सात वर्षे कार्बनने वातावरणात ४०० पीपीएम हे प्रमाण ओलांडल्यानंतर सतत हे होत आहे. या गतीने उष्णता वाढत आहे की, येत्या दोन चार वर्षांत येथे पिके येणे व जगणे अशक्य असेल. हे देशाच्या इतर भागात व पृथ्वीवर इतर खंडात याच पध्दतीने घडत आहे.

याबाबतचे तज्ञांचे आकलन चुकत आहे. ‘रघुराम राजन’ यांच्यासारखा सह्रदय अर्थतज्ञदेखील, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे धान्य उत्पादन कमी झाल्याने जीडीपी घसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतो व त्यावर उपाय म्हणून मोटार उद्योग व रस्तेबांधणीवर भर द्यावा असे सुचवतो. त्यावेळी, यामुळे धान्य उत्पादन अधिकच घटत जाईल आणि मानवजातीचा अंत जवळ येईल याची कल्पना त्यांना नसते. मी हे त्यांच्याशी त्यावेळी संपर्क करून खात्रीने लिहित आहे. हे  जग तुकड्यांमधे काम करते असे धरून, औद्योगिक जीवन चालले असल्याने व त्याच पध्दतीने शिक्षण आखले असल्याने हे घडते. इशोपनिषदाचा ९ वा मंत्र म्हणतो की, ज्यांना विद्या नाही, ते अंधारात आहेत पण जे विद्येत रत झाले आहेत, ते त्याहूनही घोर अंधःकारात आहेत.

यामुळे, पृथ्वीशी गाठ पडली की हाॅर्वर्ड व मॅसेच्युसेट्सचे विशेषज्ञही ‘विशेष अज्ञ’ ठरतात. अर्थात सम्यक, समग्र, सत्य आकलन देणारे शिक्षण असते तर पहिल्या वाफेच्या इंजिनाचा दूरगामी परिणाम समजल्यावर त्याचा पुरस्कार झाला नसता, औद्योगिकरण पुढे सरकले नसते व या घटनेला ‘क्रांती’ म्हटले गेले नसते.  यावर आधारित अर्थव्यवस्था देखील आणली गेली नसती. जग विनाशाच्या दिशेने गेले नसते. ही विचारांची क्षमता भारतीयांच्या पूर्वजांत होती.

या अर्थशास्त्राबाबत तातडीने काही सत्य समजले पाहिजे.

१. जीडीपी ( gross domestic product) म्हणजे ठोक राष्ट्रीय उत्पादन, हे विक्रीची किंमत असते. एक डोंगर किंवा जंगल, मानव व इतर जीवांसाठी महत्वाची भूमिका करत असते. परंतु ते तोडले व खनिज अथवा दगड, लाकुड, वस्तु विकले गेले की जीडीपी वाढतो. डोंगर व जंगलाच्या जगवण्याच्या क्षमतेशी, कार्याशी अर्थव्यवस्थेला काही देणेघेणे नसते. म्हणून जीडीपीची वाढ हा सतत होणारा विनाश असतो.

२. चलन हे विनिमयाचे साधन आहे. ती फक्त एक खूण आहे. ज्याचा विनिमय होतो, ती गोष्ट सजीव सृष्टीतुन किंवा पृथ्वीच्या जडणघडणीतुन येते. जर या गोष्टी कायम तशाच राहणार असत्या तरच अर्थशास्त्राला परवानगी दिली जाणे चालले असते. पण स्वयंचलित यंत्र, वीज, सीमेंट व इतर हजारो वस्तुंच्या उत्पादन, वापरात, व्यवहारात या मूळ क्षमतेचा अव्याहत नाश होतो. म्हणून आर्थिक वाढ, सतत चलन छापुन बाजारात उतरवणे, धंदा उद्योग,  पगार देणे म्हणजे अपरिवर्तनीय स्वरूपाचा विनाश आहे. चलनाचे डोंगर होत आहेत व त्यामुळे खरे डोंगर, नद्या व जीवन नष्ट होत आहे.

३. हे अर्थशास्त्र जगात सन १७५६ मधे ‘वाफेचे इंजिन’ हे पहिले स्वयंचलित यंत्र आल्याने बदललेल्या उत्पादन व व्यापार पध्दतीतुन आले. सन १७७६ मधे अॅडम स्मिथ यांचे ‘वेल्थ ऑफ द नेशन्स’, (राष्ट्रांची संपत्ती) हे पुस्तक आले. जे आजही प्रभाणभूत मानले जाते. पण यंत्र शोधणारा जेम्स वॅट, अँँडम स्मिथ किंवा त्यानंतर शंभर वर्षांनी आलेल्या यंत्र व तंत्रज्ञानाच्या पुढील  लाटेचा प्रतिनिधी असलेला

एडिसन, यापैकी कुणालाही  हे यंत्र व तंत्रज्ञान पृथ्वीवर विनाश घडवेल, अस्तित्वाचे  संकट ओढवेल, याची कल्पना आली नाही.

 वाफ निर्माण करण्यासाठी पाणी तापवताना, पृथ्वीवर पाणी यासाठी नाही, ते फक्त जीवनासाठी आहे आणि ते  तापवण्यासाठी कोळसा, तेल व वायु सतत जाळत रहावे लागेल, यात जंगलांची आहुती पडत राहील व यासाठी धातु व इतर घटक खेचण्यातुन पृथ्वी उध्वस्त होत राहील याची या शोधाच्या कैफात त्यांंना जाणीव नव्हती. यात उष्णता शोषणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड वायूची निर्मिती होणे व त्यातुन पृथ्वीचे तापमान वाढणे, हवामान बदलणे, ऋतुचक्र मोडणे, मानवजातीचे उच्चाटन या तर त्यांच्यासाठी कल्पनेतही नसलेल्या दूरच्या गोष्टी होत्या. 

हे अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था ही पृथ्वी व जीवनाच्या विरोधात आहे. 

१. पाणी हवे की पैसा,

२.  जीवन हवे की जीडीपी,

३. मान्सून हवा की मोटार,

४. अस्तित्व हवे की अर्थव्यवस्था,

हे ठरवण्यासाठी, औद्योगिकरण थांबवण्यासाठी, औद्योगिक शहरांना बंद करणारा व न मानणारांमधे मृत्युचे थैमान घालणारा  कोरोना विषाणु, हा शेवटचा इशारा आहे आणि पॅरिस कराराची २°से ची मर्यादा ओलांडणारे हे वर्ष, ही मानवजात वाचवण्याची शेवटची संधी आहे. याचे अज्ञान ही सबब होऊ शकत नाही.

पृथ्वीवर फक्त पृथ्वीच्याच पध्दतीने जगता येईल. निसर्गाच्या विरूध्द जाऊन जिवंत राहता येणार नाही. आधुनिक जग हे खरे जग नाही. ते खऱ्या जगाच्या, सत्याच्या विरोधात उभे आहे. ते विनाश पावणार आहे. देश, शेतकऱ्यांमुळे चालू आहे. उद्योगामुळे नाही. पृथ्वीने अन्न दिले ते सर्व प्राणिमात्रांसाठी. ते त्यांना मिळावे.

जीवनाचे रक्षण करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणा व आशयाचा विस्तार करणाऱ्या एका नैतिक, अहिंसक, वैश्विक क्रांतीची गरज आहे. ती क्रांती संयम, साधेपणा व पृथ्वीला जपणाऱ्या शहाणपणावर आधारित शेतीजीवन, हजारो वर्षे जगणारे भारतीय शेतकरी घडवू शकतात. फक्त गेल्या साठ वर्षांत आलेले औद्योगिकरण व अर्थव्यवस्थेचे, आधुनिक जीवनशैलीच्या इंगळीचे विष त्यांनी उतरवावे. संत एकनाथांच्या  भाषेत मनुष्यप्राण्याच्या कधीच गरजा नव्हत्या, अशा  इच्छांचा तमोगुण मागे सारावा व निरोगी जीवन देणाऱ्या काळया आईचा सत्वगुण अंगारा लावावा.

प्रथम, शेतकऱ्यांनी रासायनिक- यांत्रिक शेती बंद करावी. परंपरागत सेंद्रिय वा नैसर्गिक पध्दतीने शेती करावी. त्यामुळे शेतीतील उत्पादनखर्च बंद होईल. औद्योगिक उत्पादने वापरणे बंद करावे. म्हणजे जगण्याच्या नावाने होणारा  पण जगण्याशी काही संबंध नसलेला शहरी पध्दतीचा खर्च थांबेल.

भुकेसाठी अन्न ही हजारो वर्षांची संकल्पना पुन्हा स्वीकारावी. पृथ्वी त्यापेक्षा जास्तला परवानगी देत नाही. औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे माणसे भुकेने मरत असताना  होणारा कोट्यावधी टन धान्याचा अवाजवी संचय तिला मान्य नाही. मार्केटसाठी धान्य विकणे नाही. पाणी, वीज, बियाणी मागु नये. कर्ज काढू नये. निर्यात, प्रक्रिया, शीतगृह, मूल्यवर्धन इ. भूलभुलैया नको..सर्वत्र विषमुक्त अन्न पिकेल. माणसे व धरणीमाता दोन्हींची विषबाधा टळेल. पुढची पायरी, उद्योगपूर्व सदाहरित कृषियुगातील जीवनपध्दती घ्यावी.

तापमानवाढीच्या विनाशाची, ‘उद्योग’ ‘बांधकाम,’  ‘वीजनिर्मिती,’ ‘वाहतुक’ व ‘रासायनिक – यांत्रिक शेती’ ही पाच प्रमुख कारणे आहेत. पाचवे कारण, शेतीत शिरलेल्या औद्योगिकरणाशी संबंधित आहे. इतर कारणांत औद्योगिकरण व शहरीकरणाचा मुख्य भाग आहे.

शेती स्वावलंबी आहे तर शहरे परावलंबी. दोन्हींनी समजावे की, औद्योगिक जग तात्काळ गुंडाळावे लागेल. शेतकऱ्यांनी विचारपूर्वक तातडीने जाहीर करावे की, *आम्ही यापुढे साठ वर्षांपूर्वीच्या शाश्वत कृषियुगात परत जात आहोत. शहरांना आम्ही सध्या फुकट अन्न पुरवू पण कायम नाही. कारण आम्ही अधिकचे अन्न पिकवु इच्छित नाही.* ज्याअर्थी शहरी माणुस मुंबई, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस इ. शहरांमधे अन्न खाऊन जगतो, त्याअर्थी, जरी तो समजतो की, माझा शेतीशी संबंध नाही व माझी शेती नाही, तरी त्याच्यासाठी कुठेतरी शेती होत असते. धरणी पिकवत असते. आता त्याने ती स्वतः करावी व  पृथ्वी व स्वतःच्या तसेच मानवजातीच्या अस्तित्वाविरूध्दची औद्योगिकरणातील जगण्याची पध्दती, म्हणजे जीवनशैली थांबवावी. इतकाच काय तो फरक. 

हे करावेच लागेल. हा निसर्गाचा, पृथ्वीचा मार्ग आहे. इथे निवडीची संधी नाही. आपण कोरोनाचा लाॅकडाऊन पाहत आहोत. पण गेल्या काही वर्षांत तापमानवाढीमुळेही अघोषित व गेल्या वर्षी महाराष्ट्रात विदर्भ चंद्रपूरच्या काही भागात ‘घोषित’ लाॅकडाऊनही झाला. उलट सध्याचा लाॅकडाऊन हे संकट असले तरी उद्योग, वाहने, बांधकामे बंद आहेत. त्यामुळेच पाण्याचा उपसा बंद आहे. ‘समृध्दी काॅरिडाॅर’ व इतर प्रकल्पांनी वापरणे हा पाण्याचा गैरवापर होता. लाॅकडाऊनमुळे  प्रदूषण बंद आहे. आजारांत घट आहे. तरीही विदर्भ मराठवाड्यात अनेक भागांत विहिरींमधे पाणी नाही. 

जागतिक तापमानवाढ होत असताना, काही महिने औद्योगिकरण बंद राहिल्याचा सुपरिणाम स्पष्ट दिसत आहे. वेळीच काळाची गती ओळखावी. उष्णतेच्या लाॅकडाऊनची पुढची पायरी, विस्थापन व स्थलांतर आहे. ते देखील कायमचे. 

म्हणून या लाॅकडाऊनमधे होत आहे ती निसर्गाची जीवन फुलवणारी वाटचाल लाॅकडाऊन नसतानाही कायम व्हावी हे माणुस शहाणा प्राणी असेल तर त्याला समजावे.  आपण निसर्गावर अत्याचार करत राहिलो. म्हणून त्याला, माणसाला शाश्वत भल्यासाठी शिक्षा करून सुधारण्याचा मार्ग घ्यावा लागला, असाही अर्थ निघु शकतो. मुंबई व इतर शहरांतील माणसांनी जगवणाऱ्या निसर्गात, गावात परत यावे.

माणुस हा स्थानिक जीवन जगणारा प्राणी आहे. शहर त्याविरुद्ध आहे. सरकारने ‘एम आय डि सी’, ‘सिडको’ ‘ एम एम आर डि ए’  व इतर औद्योगिक व विकास यंत्रणा बंद कराव्या. औद्योगिकरण सोडून परत फिरू इच्छिणारांकडे शेतजमिन नसल्यास कुटुंबामागे एक एकर जमिन द्यावी. मोठी जमिन बाळगणारांनी त्या सोडाव्या. त्या जंगलांकडून हिरावून घेतल्या होत्या. त्या जंगलाला वा ज्यांना शेती करायची आहे त्यांना परत  द्याव्या. पृथ्वी मालकीची संकल्पना मान्य करत नाही. ती पिढ्यानपिढ्यांना जन्म देते व पालन पोषण करते.

शेतकऱ्यांनी लाॅकडाऊनच्या काळात सरकारला धान्य म्हणजे अन्न फुकट पुरवावे. पैसे नाहीत म्हणून दारू विकावी लागणार नाही आणि कोरोना विषाणु आटोक्यात आलेला नसताना लाॅकडाऊन उठवावा लागणार नाही. कोरोना औद्योगिक शहरांनाच बंद करत आहे. आपण त्याचा इशारा वेळीच ओळखावा. ही साथ गेली तरी आणि गेली नाही तरी, उद्योग व शहरे विसर्जित करावी.

कोरोना वा त्यापेक्षा भयंकर एबोलासारखा ९०% मृत्यूदर असलेला विषाणु नजिकच्या भविष्यात कायम राहू शकतो. म्हणून त्यांना आमंत्रण देणारा औद्योगिकरणाचा हट्ट सोडावा. जीवनाची निवड करावी, जीवनशैली सोडावी. निसर्गाचा भाग बनुन राहण्यात, गावात, शेतीत हित आहे. शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, मानवजातीला वाचवू शकतात. शेतकऱ्याने रासायनिक – यांत्रिक शेती पध्दत बंद केल्यावर उत्पादनखर्च जातो आणि औद्योगिकरणातील भौतिक वस्तु वापरणे बंद केल्यावर जगण्याच्या नावाने होणारा, पण जगणे नसलेला खर्च थांबतो. अशा मानवी मुल्ये जपणाऱ्या स्वयंपूर्ण स्वावलंबी शेतकर्‍यांनी स्वातंत्र्यलढा केला. आज त्यापेक्षा मोठी भूमिका ते करू शकतात. स्वतःबरोबर मानवजात व जीवसृष्टी वाचवु शकतात. त्यांनी, ‘भूकेसाठी अन्न’ ही शाश्वत संकल्पना मानवजातीच्या प्रेमापोटी तिचे रक्षण करण्यासाठी स्वीकारावी. त्यामुळे औद्योगिकरण व शहरीकरण बंद होईल. औद्योगिकरणातील माणसांनी यंत्रवत जीवन थांबवावे व शहरे सोडून निसर्गात जाऊन आपले अन्न आपण स्वतः पिकवावे. यासाठी असलेल्या गावांतच जायला पाहिजे असे नाही.  नव्या वाड्या तयार होऊ शकतात. हे स्वप्नरंजन नाही. आपण माणसे, दहा हजार वर्षे शेतीयुगात व लाखो वर्षे जंगलात होतो  आणि तेव्हा आजच्याप्रमाणे अस्तित्व धोक्यात आले नव्हते. उलट औद्योगिकरण हे स्वप्नरंजन आहे. ते देखील दुःस्वप्न.

पृथ्वीवर नैसर्गिक शेती, चरखा-  हातमाग, माती व बांबू लाकडाची घरे, मातीच्या चुली,  बैलगाडी- घोडागाडी, या वास्तविक ( practical ),  व्यवहार्य व काळाच्या कसोटीला उतरलेल्या शाश्वत गोष्टी आहेत. परंतु मोटार,  बाईक, विमान, टीव्ही, एसी, फ्रीज, काँप्युटर, मोबाईल इ. वस्तु उपऱ्या, आगंतुक, अवास्तव ( impractical ), अव्यवहार्य, अशाश्वत गोष्टी आहेत.

शहरांतील व गावातील त्या मानसिकतेच्या माणसांचे ‘रोबो’ झाले आहेत. त्यांना जिवंत झाड व मातीपेक्षा मोटार व सिमेंट आवडते. नातलग व सजीव प्राणिमात्र यापेक्षा निर्जिव वस्तुंचे प्रेम वाटते. ते त्यांनी सोडावे नाहीतर निर्जिव वस्तु राहतील व ते स्वतः नसतील. पिरॅमिड व इतर संस्कृतींची एका   मोठ्या भौगोलिक क्षेत्रामधील उदाहरणे आहेतच. ते पृथ्वीपातळीवर घडेल. सध्या वाहने चालवण्यासाठी अनेकांचे हात, नव्हे मन फुरफुरते आहे. पण त्यांनी लक्षात घ्यावे, लाॅकडाऊन  समजावत आहे की, जगणे म्हणजे काय व त्यासाठी जे लागते ते पृथ्वी विनाशुल्क पुरवते. त्यात मोटार, बाईक इ. बसत नाही. युरोप व अमेरिकेतील अभ्यास हे स्पष्ट करत आहेत की वाहने ( मुख्य मोटार व बाईक स्कूटर ) बांधकाम रिफायनऱ्या औष्णिक विद्युत इ. प्रदूषणामुळे श्वसनमार्ग व फुफ्फुसे आधीच खराब केल्याने व या गोष्टी न थांबवल्याने औद्योगिक शहरांतच कोरोनाने हजारो बळी घेतले. लाॅकडाऊन उठवले व वाहने ( मुंबईत ४० लाखावर मोटारी आहेत ) बांधकामे चालू केली तर कोरोनाच्या साथीचा पुन्हा, स्फोट होईल. कमी बाहेर पडणे अंतर ठेवून चालणे व कमी प्रवासी घेऊन सार्वजनिक वाहने वापरणे आणि खाजगी वाहने यापुढे बंद करणे हे शहरे थांबवण्याच्या मधल्या स्थित्यंतराच्या काळात आवश्यक आहे.

नोटा छापुन होणाऱ्या भौतिक विकासात, जीवन व ते देणारी क्षमता क्षणोक्षणी नष्ट होत आहे. हे परत आणता येत नाही. आता माणसाची पाळी आहे. तरी तो पैशाशिवाय जगायचे कसे ? असे म्हणतो. कारण तो कृत्रिम जगात राहतो. यावर उपाय एकच आहे. पूर्ण इच्छाशक्ती लावुन सर्वांनी कृत्रिम जग कायमचे बंद करणे व निसर्गाच्या, पृथ्वीच्या, ईश्वराच्या खऱ्या जगाला वाव देणे व त्यात दाखल होणे. इतर निरोगी राहणाऱ्या प्राणिमात्रांप्रमाणे त्याच्या हाती स्वतःला सोपवणे. त्याचे नियोजन व व्यवस्थापन स्वीकारणे. समर्पण करणे. ही गोष्ट आत्ता या क्षणी शेतकरी, मच्छीमार व आदिवासी करू शकतात व शहरी माणसे वेगाने त्याचे अनुकरण करू शकतात.

लहान बालकांच्या निरागस डोळ्यांत पहा. तुम्हाला जीवनाची इच्छा दिसेल. १५-१८ वर्षे वयाच्या तरूणांशी बोला. त्यांना तापमानवाढीचे, मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या सुरू झालेल्या उच्चाटनाचे व, त्यांची पिढी ही पृथ्वीवरील शेवटची पिढी ठरणार असल्याचे, ज्ञान द्या. ते बाईक, कार, टीव्ही, काँप्युटर इ. चे स्वप्न सोडतात. जिवंत राहणे निवडतात. शेती शिकुन ऊर्जाविरहित जीवन जगण्यासाठी आपल्याबरोबर डहाणूला शेतात येतात. बाहेर, माणसे असे का म्हणतात की, ‘आता खुप पुढे गेलो, आता मागे जाता येणार नाही’. अहो, तुम्हाला फक्त ही खोटी जीवनशैली सोडायची आहे. काही शिवाजी, तानाजी, बाजी किंवा गांधी, भगतसिंगांसारखा पराकोटीचा त्याग, बलिदान  तर करायचे नाही. शिवाय तुमच्याच मुला नातवंडांच्या पिढ्यांना जीवन द्यायचे आहे. त्यासाठी एवढेही करणार नाही का ? पन्नास- साठ वर्षांपूर्वी जगात आलेली व प्रतिष्ठा, सुख, सोय, आरामाच्या नावे आपल्याला नष्ट करणारी जीवनशैली सोडणार नाही का ?

हे जर आपण करणार नाही तर संतांचे नाव घेणे हे केवळ ढोंग ठरते. तुकोबा म्हणाले,

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असो द्यावे समाधान

औद्योगिकरण समर्थकांनी याला ‘निष्क्रियता’ म्हटले. परंतु प्रत्यक्षात, ज्याची तुलना करता येणार नाही अशी ही ‘सक्रियता’ आहे. या विश्वातील अणुरेणू सक्रिय आहे. आपल्या शरीरातील चार पाचशे कोटी, डोळ्याला न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म पेशी जिवंत आहेत, क्षणोक्षणी काम करत आहेत, ह्रदय धडधडत आहे, इंद्रिये कार्यरत आहेत, म्हणून आपण अस्तित्व अनुभवतो. यातील काही आपण आपल्या इच्छेने घडवत नाही. तेच तुकोबांचे ‘अनंते’, म्हणजे अनिर्वचनीय, अवर्णनीय, अज्ञात तत्व आहे. या तत्वाची, पेशींची इच्छा जिवंत राहणे ही आहे. आपल्या भौतिक इच्छा त्याविरुद्ध काम करतात. 

 त्याच्या विरूद्ध जाणाऱ्या आपल्या मनाच्या, कृत्रिम औद्योगिक जगात निर्माण झालेल्या भौतिक इच्छा, मोटार, बाईक, टीव्ही, फ्रीज, काँप्युटर, एसी, सीमेंट, मार्बल, ऊर्जा, वीज इ., ज्या जीवनाचा नाश करत आहेत त्या झुगारून देऊ. पृथ्वीची निसर्गाची कास धरू. पुढील पिढ्यांना वाचवु. नैसर्गिक, सेंद्रिय, परंपरागत शेती करू. चरखा हातमागावरचे वस्त्र वापरू. माती- बांबू व लाकडाचा किमान वापर असलेल्या घरात राहू. धूर न होणाऱ्या चुली व मातीची भांडी वापरू. प्रवास टाळू. बैलगाडी वापरू. मनाने उत्क्रांत, विकसित होऊ. यामुळे पृथ्वीची जडणघडण, डोंगर, जंगल, मातीचा थर, नद्या, सागर, भूजल,  वातावरण टिकेल. कार्बन व इतर उत्सर्जन जवळजवळ थांबेल. हरितद्रव्य वेगाने वाढेल. उत्क्रांतीत हरितद्रव्यामुळेच मानवासारख्या प्रजाती विकसित झाल्या. जंगल झाडे, नद्या, सागरातील हरितद्रव्याचा पुन्हा नैसर्गिक विकास होऊ दे. तेच आपणास विषाणु, कॅन्सर व तापमानवाढीपासुन वाचवेल. तापमान कमी होऊ लागेल. मानवजात व जीवसृष्टीचे रक्षण होईल.

हे आपल्या हातात आहे.

ऍड. गिरीश राऊत

निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

९८६९०२३१२७


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय