पुणे(२३ मे):- करोना महामारी ने थैमान मांडले नि लोकडाऊन मुळे लोकांनी स्वतःला घरांत बंदिस्त करून घेतलं. परंतु डॉक्टरांच्या समोर हा पर्याय नव्हता नि त्यामुळे सरकारी क्षेत्रातील डॉक्टर्सना तर अहोरात्र काम करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. मात्र काही खासगी डॉक्टर्सनी रुग्णसेवेची बांधिलकी मानत रुग्ण सेवा सुरु ठेवली.
सरकारने देखील खासगी डॉक्टर्सना दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले व अनेक खासगी डॉक्टरांना नोटिसा दिल्या.
ह्या सगळ्या परिस्थितीत पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथील वस्तीच्या क्षेत्रात डॉ.संजय शेलार ( बीएएमएस BAMS , वय 56 ) ह्यांनी मात्र जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा सुरूच ठेवली. गेली अनेक वर्षे ते गोर गरिबांची सेवा करत होते व संकटाच्या काळात देखील त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
परंतु रुग्ण सेवा करतांना त्यांना करोनाची लागण झाली. सुरुवातीला ते पुण्यातील कॅंटोन्मेंट च्या सरदार पटेल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. १२ मे रोजी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. १३ तारखेला ते ससून मध्ये ऍडमिट झाले. ते ससून मध्ये पोहोचताच मला
नाशिक मधील ऑर्थोपेडिक सर्जन व माझे खूप जवळचे मित्र डॉ. संजय जाधव ह्यांचा फोन आला . डॉ.जाधव ह्यांच्या पत्नीचे डॉ . संजय शेलार सखे मोठे भाऊ डॉ. जाधव ह्यांनी मला डॉ.शेलारांवर लक्ष असू दे असे सांगितले व तेव्हापासून मी डॉ.जाधवांना डॉ. शेलारांचे अपडेट्स नियमितपणे देत होतो. ससूनमध्यें आल्यावर त्याच दिवशी डॉ. शेलारांना आयसीयूत घेण्यात आले.
पुढं काही दिवस ते नॉन इंव्हेजीव व्हेंटिलेशन वर होते.
तब्येत बिघडत चालली होती व अखेरीस त्यांना व्हेंटिलेटर वर घेण्यात आले. ससून मधील डॉकटर्स खूप प्रयत्न करत होते. काही तास डॉक्टर शेलार ह्यांना प्रोन पोझिशन देखील देण्यात आली. प्रोन पोझिशन द्वारे ऑक्सिजन पुरवठा योग्य होण्याची शक्यता असते. परंतु तरी देखील काही उपयोग झाला नाही व अखेरीस २२ मे, शुक्रवारी दुपारी डॉ . शेलारांनी प्राण सोडला. करोनाच्या विषाणूमुळे न्यूमोनिया व हृदयाला सूज ह्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला. करोनाशी झुंज अपयशी ठरली.
डॉ शेलार ह्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे. २ मुले आहेत. कुटुंबाची सगळी आर्थिक जबाबदारी डॉ.शेलार ह्यांच्यावर होती. त्याचा जाण्यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार नाही राहिला.
ह्या परिस्थितीत सरकारने डॉ.संजय शेलार ह्यांना किमान ५० लाख रुपयांचे साहाय्य करणे आवश्यक आहे.
डॉ.शेलार ह्यांच्या मोठ्या मुलाने दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते कि डॉ. शेलार हे कर्तव्य बजावत असतांना त्यांना करोना ची लागण झाली व त्यामुळे त्यांचा जीवन विमा सरकारने द्यावा. ही मागणी अगदीच रास्त आहे.
सरकारने आदेश दिले होते कि खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सनी दवाखाने सुरु ठेवावेत.
डॉ.शेलार हे प्रामाणिकपणे रुग्ण सेवा करत होते . साहजिकच सरकारवर जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची. खासगी डॉक्टर्सना स्वसंरक्षणासाठी पुरेसे संरक्षण साहित्य व आरोग्य व जीवन विमा देणं हि सरकारची जबाबदारी आहे.
सरकारी डॉकटर्सना अशी विमा योजना सरकारने दिलीय हे खूप महत्वाचे आहे, पण रुग्ण सेवा सुरु ठेवणाऱ्या खाजगी डॉक्टर्सना देखील सरकारने ह्या सुविधा द्याव्यात.
स्वतःच्या जीविताची पर्वा न करता डॉ .संजय शेलारांनी अखंडपणे रुग्ण सेवा केलीय व आपले उत्तरदायित्व प्रामाणिकपणे पार पाडले .
आता जबाबदारी सरकारची आहे उत्तरदायित्व निभावण्याची व डॉ.शेलारांच्या कुटुंबाला मदत करण्याची .
डॉ संजय दाभाडे(पुणे)
जन आरोग्य मंच