Friday, November 22, 2024
Homeराज्यहायवेवरून पायी जाणाऱ्या मजुरांसाठी दिला प्रेमाचा घास

हायवेवरून पायी जाणाऱ्या मजुरांसाठी दिला प्रेमाचा घास

  पुणे (२४ मे) :- मागील अनेक दिवसांपासून वेगवेळ्या रस्त्यांवरून गावाकडे चालत निघालेल्या मजूरांचे वेदनादायक चित्र सारा देश पहात आहे. अनेक ठिकाणी पोलिसांचा मार खात किंवा मार चुकवत, तर काही ठिकाणी पोलिसांची मदत स्वीकारून ही मंडळी हजारो किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी निघतात आणि यातच आजपर्यंत सुमारे ४०० पेक्षा अधिक मजूर आपला जीव गमावतात तरीही त्यांचा प्रवास सुरूच आहे. सुरू राहणार आहे.

अशा परिस्थित अनेक मंडळी पुढे येऊन या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात,सहकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करू लागतात, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची असलेली कष्टकरी चळवळीची नाळ आणि जिवंत संवेदनशीलता हेच आहे.

पुणे नाशिक हायवेवर राजगुरुनगर शहर आहे, या शहरात रस्त्याच्या कडेलाच लागून किसान सभेचे कार्यकर्ते अमोद गरुड राहतात. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर राजगुरुनगर शहरातील अनेक कामगार,बेघर कुटुंबियांना त्यांनी व त्यांच्या मित्र मंडळींनी सुमारे ८०,००० पेक्षा अधिक रक्कम जमा करून मदत पोहचवली. यासाठी अनेक कष्टकरी चळवळी व राजगुरुनगर मधील विविध सामाजिक संस्था,गट यांनी हि सहकार्य केले.

लहान मुलांनी ही यात सहभागी होऊन किराणा माल चे कीट तयार करण्यात मोठी मदत केली. याबरोबरच घरातच लोकांनी थांबावे म्हणून परिसरातील शेतकरी यांना सोबत घेऊन घरपोहच रास्त भावात भाजीपाला पोहचवून त्यांनी शतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क घडवून आणला.

अलीकडे १५ ते २० दिवसांपासून घरापासून हाकेच्या अंतरावर असणारया शेकडो मजुरांना दयनीय स्थितीत चालत जाताना पाहून पुन्हा ते पुढे आले.  दररोज पत्नीने केलेले जेवण ते सोबत घेऊन गाडिवर एक मित्र आणि सोबत जेवणाचे पॉकेट असे घेऊन ते राजगुरुनगर ते मंचर पर्यंत जायचे व या दरम्यान मिळणाऱ्या शेकडो, मजुरांना घरचे जेवण देत असत.

काही मजूर हे जेवण संध्याकाळसाठी शिल्लक ठेवत पण उन्हांमुळे हे जेवण खराब होत असे, त्यामुळे त्यांनी जेवणाबरोबर शिजवलेले हरभरा देऊ लागले.

या कामात त्यांना निलेश संभूसू व भिशु दीक्षित,आदित्य गारगोटे,राहुल मिसाळ, संतोष कुलकर्णी या मित्रांनी महत्वपूर्ण मदत केली. या सर्व कामासाठी पास काढण्याच्या कामात कॉंग्रेसचे स्थानिक नेते विजय डोळस यांनी सहकार्य केले.

यानंतर त्यांच्या घराशेजारीच एस.टी.महामंडळ यांनी या रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या एस.टी.थांबविण्याचे नियोजन केले.

येथे पुन्हा मजुरांचे थवेच्या थवे विसावू लागले. यांच्या जेवणाचा प्रश्न होता, मग येथेच त्यांनी,व मित्रांनी या मजुरांना जेवण देण्याचा प्रयत्न सुरु केला व जेथे राहतात. त्या सोसायटीतील सर्वांनी एकत्रित येऊन दररोज सुमारे ७०० ते ८०० पेक्षा अधिक लोकांचे जेवण करून या सर्व मजुरांना जेवण देण्याचे काम सुरू केले.

या सर्व कामात अमोद गरुड, त्यांची पत्नी आणि त्यांची पाबळ गुरुकृपा ही सोसायटी व सर्व सदस्य यांनी या कामात झोकून दिले.

याकामात त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व मित्र, बलुतेदार क्रांती संघटना,पाबळ व सोपेकॉम संस्था यांनी सर्वांनी सहकार्य केले.

याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या असंवेदनशील वृत्तीवर आणि धोरणांवर प्रचंड टीका करतानाच या मजुरांना मजुरांना कष्टाची भाकर खाऊ घालणारे किसान सभेचे कार्यकर्ते अमोद गरुड व या कामात सहभागी झालेल्या सर्व व्यक्ती,संस्था,संघटना यांच्या कार्याला सलाम….


डॉ. अमोल वाघमारे

अखिल भारतीय किसान सभा, पुणे

संबंधित लेख

लोकप्रिय