जालना : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेले आहेत. परंतु सरकारने संपाला 38 दिवस होऊन देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याची योग्य ती दाखल न घेतल्याने आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सीटू सलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर दोन तीन तास रस्ता रोको करण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते कॉम्रेड अण्णा सावंत, सीटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, कांता मिटकरी, साजेदा सय्यद, कांचन वाहुळे, मथुरा रत्नपारखे, संगीता वायखिंडे यांनी केले. एस एफ आय चे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा देत मार्गदर्शन केले.
38 दिवसापासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना वरिष्ठ अधिकारी नोटिसा पाठवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यांना मानसिक त्रास दिला जात. आहे म्हणून हा रास्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सेविका व मदतनीस अधिकाऱ्यांकडून कामावरून कमी करण्याच्या नोटिसा येत आहे. याबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यांना जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धारही जिल्हा परिषदेसमोर झालेल्या सभेत सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी केला.
यावेळी सिटूचे जिल्हा सेक्रेटरी ॲड.अनिल मिसाळ, बंडू कणसे, मिरा बोराडे, सबिया सय्यद, सुषमा दीक्षित, लता अटोळे, मनीषा सोळुके, दगडा पितळे, राही वाघ, उषा तंगे, सुनंदा पवार, यशोदा गवळी, सपना वाहुलें, अनिता राठोड, जया डिघुळे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी रास्ता रोको सहभागी झाल्या होत्या.