नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी बहिष्कार टाकला हे अत्यंत चुकीचे असून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींनी या बैठकीत उपस्थित राहून नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सूचना करायला हव्या होत्या, अशी टिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी. एल. कराड याांनी केली आहे.
भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आणि खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांना जनतेने मतदान केले आहे, नाशिक जिल्ह्यात कोरोणाचा फैलाव वाढत असताना व जनता संकटात असताना बहिष्कारासारखी स्टंटबाजी करणे योग्य नाही, शासनाचे काही निर्णय पटत नसल्यास बैठकीत उपस्थित राहून टीका करता आली असती, चांगल्या सूचना करता आल्या असत्या, परंतु भारतीय जनता पार्टी फक्त राजकारण करत आहे, त्यांना जनतेच्या आरोग्याबद्दल काही देणेघेणे नाही हेच यावरून स्पष्ट दिसून आले आहे, असल्याचे डॉ. कराड यांनी म्हटले आहे.
केंद्रातील भाजपच्या सरकारने कुठलीही वेळ न देता लॉकडाऊन लागू केले, त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले. रोजगार आणि व्यवसाय बुडाला. उपासमार होत आहे. केंद्र सरकारने एक रुपयाही थेट आर्थिक मदत जनतेला दिलेली नाही व कोरोनाची परिस्थिती सरकारने अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळली असेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे. लॉकडाऊन च्या काळात जनतेने दरमहा साडेसात हजार रुपये आर्थिक मदत देण्याची व अन्य मागण्या केल्या होत्या, त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. केंद्र सरकार फक्त विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यामध्ये मग्न आहे. भारतीय जनता पार्टीने केंद्रात सत्ताधारी व राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असे माकपने म्हटले आहे.