औरंगाबाद : विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन काम करणाऱ्या मराठवाडा लॉ कृती समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. नवनाथ देवकते यांनी ही घोषणा केली आहे.
यानुसार अविनाश धायगुडे यांची अध्यक्ष म्हणून तर गणेश शिंदे यांची सचिव म्हणून सर्वसंमतीने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून आकाश साळवे आणि सहसचिव पदी निता वाघ यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून योगेश सोळुंके, मीडिया प्रमुख मनोज शिवरकर तर चिटणीस म्हणून नितीन पवार यांची नियक्ती झाली आहे.
सध्या कोरोना काळात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर सर्वच विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासन व कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून अव्वाच्यासव्वा फी वसूल केली आहे. यामुळे आधीच शिक्षण महाग झाल्यामुळे डबघाईला आलेला विद्यार्थी वर्ग आणखीनच हैराण झाला आहे. “विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले परीक्षा शुल्क लवकरात लवकर परत करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा या प्रश्नावर पुढच्या काळात कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल” असा इशारा कृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अविनाश धायगुडे यांनी यावेळी दिला आहे.