श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती ‘आषाढी अमावस्या’ (Ashadhi Amavasya) ज्याला अलीकडे ‘गटारी अमावस्या’ (Gatari Amavasya) असे ही म्हटले जाते. (Akhad Party)
सध्या गटारी म्हणजे दारु, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे. यामुळेच हि अमावस्या बदनाम झाली आहे. मद्यसेवन करून धिंगाणा घालणारी अमावस्या काही लोकांनी बदनाम केली आहे. काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका खाद्य उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवशी मांसाहारी भोजन कार्यक्रम घरोघरी आखले जातात. श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. दुस-या दिवशी श्रावण मास चालू होणार. सोवळंओवळं, उपासतापास, व्रतवैकल्यांचा महिना सुरू होतो.
आषाढात या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा २९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. (Akhad Party)
कोंबडी वडे ही आमच्या कोकणातील गटारीची सुप्रसिद्ध खाद्य संस्कृती आहे.
तांदळाच्या पिठाचे चविष्ट वडे बनवून पारंपारिक गावरान कोंबडीच्या तर्रीदार करिबरोबर किंवा त्यास सागोती म्हणून खाल्ला जातो. कोकणात सर्वत्र कोंबडी वडे स्वादिष्ट बनवतात. वडे बनवताना वापरल्या जाणाऱ्या पिठाचा सर्वात चांगला भाग म्हणजे प्राचीन काळापासून कोकणातील म्हणजे रत्नागिरी, चिपळूणचे पीठाचे मिश्रण वापरतात.
कोंबडी वडा हा कोकणी पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. विशेषत: मटन किंवा चिकन सोबत खाण्यासाठी हे वडे केले जातात. कोंबडीचा रस्सा आणि वडे ही डिश देखील चांगलीच फेमस आहे.
तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे आमच्या कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश “कोंबडी वडे ” म्हणून प्रसिध्द आहे. हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे “मालवणी वडे ” म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा यात बुडवून खाल्ले जातात. (Akhad Party)
त्यामुळे आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी कोंबडी वडे स्पेशल डिश मोठ्या शहरात ठराविक ठिकाणीच मिळते. अशा काही विविध हॉटेलमध्येही नॉनव्हेजप्रेमींची गर्दी यासाठी असते.
गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच.
चला घरीच बनवा कोंबडीवडे
कोंबडी वडे बनवण्याचे साहित्य –
एक किलो तांदूळ
धणे ३ चमचे
एक चमचा मेथी
चण्याची डाळ एक वाटी, उडदाची डाळ एक वाटी
बडिशेप १ चमचा
कोंबडी वडे बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून पीठ दळून आणा. चण्याची डाळ, उडदाची डाळ भिजत घाला आणि बारीक वाटून घ्या. वडे बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात या दळलेल्या डाळी, धणेपूड, बडिशेप, मीठ एकत्र करा. हे पीठ भिजवताना कोमट पाण्याचा वापर करा.
दरम्यान, या पिठात एक कांदा बारीक करून घाला. यामुळे वड्यांना चांगली चव येईल. पीठ मळून झाल्यानंतर एक ते दीड तास पीठ तसेच ठेवा. यामुळे पीठ चांगले फुलून येईल. यामुळे वडे चांगले खुसखुशीत होतील. वडे थापण्यासाठी तुम्ही केळीचे पान वापरू शकता अथवा प्लास्टिकचा तुकडा.
याला तेल लावा आणि पिठाचा छोटा गोळा घेऊन तो तेलावर थापा. हे वडे गरम तेलात तळून घ्या. चिकनच्या रस्स्यासोबत हे वडे चविष्ट लागतात. (Akhad Party)
गावरान कोंबडी रस्सा रेसिपी
साहित्य:
• ७५० ग्रॅम गावठी कोंबडीचे चिकन, स्वच्छ धुऊन, मध्यम आकाराच्या तुकडे करून घ्या.
• १ कप कोथिंबीर
• अर्धा कप पुदिन्याची पाने
• ४ हिरव्या मिरच्या
• दीड इंच आल्याचा तुकडा
• ७-८ लसणीच्या पाकळ्या
वाटणासाठी :
•ओला नारळ = १५० ग्रॅम्स किसलेले थोडे सुके खोबरे
• ३ मध्यम कांदे बारीक चिरायचे
• ५-६ लसणीच्या पाकळ्या
• १ चमचा हळद
• ३ चमचे मालवणी मसाला
• एका लिंबाचा रस
• थोडेसे मीठ अंदाजे
• तेल
आता बघा कसं करायचं
• चिकनच्या तुकड्यांना हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस चोळून १० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे .
• मिक्सरमधून आले, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना पाव कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
• एका प्रेशर कूकरमध्ये ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात हिरवं वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे ( ४-५ मिनिटे )
• आता चिकनचे तुकडे घालून नीट मसाल्यात एकत्र करून घ्यावेत. आच मंद करून झाकून ३-४ मिनिटे एक वाफ काढावी.
• चिकनला थोडे पाणी सुटू लागते. कुकर मध्ये दीड कप पाणी घालून कुकर बंद करावा. मंद ते मध्यम आचेवर १० -१२ मिनिटे चिकन शिजवून घ्यावे. २-३ शिट्ट्या काढल्या तरी हरकत नाही, शक्यतो कुकर न वापरता पातेल्यात करा
• कुकर थंड होईपर्यंत वाटप करून घ्यावे. एका तव्यात सुके व ओले खोबरे चांगले खरपूस भाजून घ्यावे ( ५-६ मिनिटे ) एका ताटलीत काढून घ्यावे.• त्याच तव्यात १-२ टेबलस्पून तेल घालून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी. नंतर कांदा घालून चांगला खरपूस भाजून घ्यावा (८ ते १० मिनिटे)
• नंतर भाजलेले सुके खोबरे मिसळून गॅस बंद करावा. वाटप थंड झाले की मिक्सरमध्ये पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
• एका मोठ्या लंगडीत ३-४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे, त्यात मालवणी मसाला घालून तो करपू नये म्हणून थोडे पाणी घालावे . तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
• आता वाटण म्हणजे ग्रेव्ही घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे (५मिनिटे )
• नंतर चिकनचे तुकडे घालून त्यातच चिकन शिजवलेले पाणी घालावे. मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी. चवीपुरते मीठ घालावे. झाकून मंद आचेवर ५-७ मिनिटे रस्सा मुरत शिजवून घ्यावा.
• हा कोंबडीचा रस्सा असा तयार झाला.
आपला कोंबडीचा रस्सा आता तयार झाला की, त्याचा सुगंध घरभर पसरतो. आणि समोर असतात, फुगलेले कोंबडी वडे, त्याला भोक पाडून त्यात रस्सा टाकून सुरू करा खायला कोंबडी वडे.
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड