Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअजित पवार यांना जाणीवपूर्वक बोलू दिले नाही - काशिनाथ जगताप

अजित पवार यांना जाणीवपूर्वक बोलू दिले नाही – काशिनाथ जगताप

पिंपरी चिंचवड : देहू येथील शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे वेळी  शव्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाराजी आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण नियोजन भाजप आणि सांप्रदायिक लोकांच्या हातात होते, असे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील हा मोठा कार्यक्रम अराजकीय आणि सर्वसमावेशक करताना गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस काशिनाथ जगताप म्हणाले.

जगताप पुढे म्हणाले, मावळ, पिंपरी, चिंचवड, भोसरी, खेड विधानसभेच्या आमदारांना आणि पुणे जिल्ह्यातील खासदारांना या ठिकाणी मंचावर स्थान नव्हते. पंतप्रधान कार्यालयाने कार्यक्रम पत्रिका ठरवताना कोणाचा सल्ला घेतला होता. हा कार्यक्रम भाजपचा की देहू संस्थानचा यावर चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुणे विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडवले. मात्र देहू येथील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देता संयोजक आणि पंतप्रधान कार्यालयाने वारकरी संप्रदायाच्या व्यापक विचारसरणीला तिलांजली दिली आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांचे देहूरोड येथील आगमन हा आनंद सोहळा होता. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचे दर्शन संपूर्ण देशाला लाईव्ह पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलायची संधी दिली असती तर महाराष्ट्राचा अपमान झाला नसता, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय