Wednesday, May 22, 2024
Homeकृषीकृषी : संपूर्ण सौरऊर्जेवर केली पर्यावरणपूरक खवानिर्मिती

कृषी : संपूर्ण सौरऊर्जेवर केली पर्यावरणपूरक खवानिर्मिती

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील विनोद जोगदंड यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून २०१२ पर्यंत वीस वर्षे सेवा केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत भूमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसायात त्यांनी झोकून दिले.वास्तविक पूर्वीपासून त्यांच्याकडे दूध खरेदी केंद्र होते.

दररोज दोन हजार ते २५०० लिटर दूध संकलन व्हायचे. मात्र सात ते आठ वर्षांपासून ते खवा निर्मितीकडे वळले. विनोद यांना नवे प्रयोग, सातत्याने अभ्यास करणे, कुतूहल निर्माण झाले, की पाठपुरावा करणे या बाबींचा ध्यास आहे. खवा उद्योगात उतरतानाही त्यांनी या कौशल्याचा वापर केला.

उद्योगाचे आर्थिक गणित जाणून घेताना इंधनावर सर्वाधिक खर्च होत असल्याचे लक्षात आले. त्यातूनच सौरऊर्जेवर हा प्रकल्प चालविण्याची संकल्पना त्यांना सुचली. बँकेकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांनी हा प्रकल्प उभा केला. आज पत्नी स्वाती यांची त्यांना उद्योगात समर्थ साथ आहे. मुलगा संकेत ‘बीसीए’ तर मुलगी श्वेता ‘बीबीए’ चे शिक्षण घेत असून तेही आपल्या परीने मदत करतात.

‘इंडक्शन मशिन’ केले विकसित

जोगदंड यांनी उभारलेला सौर प्रकल्प पाचशे किलोवॉट क्षमतेचा असून, त्यातून प्रतिदिन २००० ते २५०० युनिट वीजनिर्मिती होते. त्यासाठी तब्बल १५०० सौरपॅनेल बसविले आहेत. नेटमीटर पद्धतीद्वारे महावितरणमार्फत विजेची साठवणूकही होते.

गरजेप्रमाणे खवा निर्मितीसाठी ‘इंडक्शन मशिन’द्वारे त्याचा वापर केला जातो. हे यंत्र जोगदंड यांनी स्वतः विकसित केले आहे. यामध्ये अजून सुधारणा केल्या जात आहेत.

खवानिर्मिती प्रक्रिया

खवा बनविवण्यासाठी २० कढया आहेत. प्रति कढईची दूध साठवण क्षमता २०० लिटर आहे. मात्र प्रत्यक्षात खवा बनवण्यासाठी ४० लिटर दूध घेतले जाते. सौऱऊर्जेद्वारे निर्माण होणारी वीज ‘इंडक्शन मशिन’द्वारे वापरुन सुमारे एक तासापर्यंत शंभर अंश सेल्सिअस तापमानापर्यंत दूध उकळले जाते.

त्यापासून आठ ते साडेआठ किलो खवा तयार होतो. एक, पाच व वीस किलो वजनात प्लॅस्टिक पिशवीमध्ये ‘पॅक’ केला जातो. प्रति किलो घाऊक २०० ते २५० रुपये तर किरकोळ विक्रीसाठी ३५० ते ४०० रुपये दराने विक्री केली जाते.

दूध आणा, खवा करून घेऊन जा

मोठे व्यावयासिक, विक्रेते यांना मागणीनुसार खवा तयार करून देण्यात येतो. त्याचबरोबर दूध आणा आणि खवा तयार करून घेऊन जा अशी देखील संकल्पना जोगदंड राबतात. दररोज ५० हून अधिक शेतकरी आणि छोटे व्यावसायिक त्यांच्याकडून ही सेवा घेतात. काही व्यावसायिक दुधाबरोबर साखर घेऊन येतात आणि पेढाही बनवून घेऊन जातात.

जोगदंड यांची जांब या मूळगावी १० एकर शेती आहे. दूध व्यवसायात येण्याआधी त्यांनी शेतीतही केळी, पपई, कलिंगड, खरबूज अशी पिके घेतली. सायफन पद्धतीचा वापर करीत तीन किलोमीटरवरून शेतात पाणी आणले. पुढे मात्र पूर्णवेळ ते दूध व्यवसायाकडे वळले.

सौरऊर्जानिर्मिताला हवे प्रोत्साहन

सध्या भूम परिसरामध्ये दररोज सुमारे चार लाख लिटर दूधसंकलन होते. त्यातून तालुक्यात दररोज २५ ते ३० टनांपर्यंत खवा, तर १५ ते २० टन पेढ्याची निर्मिती होते. भूम परिसरात लाकूड इंधनावर आधारित (सरपण) खवाभट्ट्यांची संख्या अधिक आहे.

दररोजची खवानिर्मिती पाहाता इंधनासाठी वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि भट्ट्यांतील धुरामुळे आरोग्य या समस्या उभ्या राहतात. या पार्श्‍वभूमीवर जोगदंड यांचा सौरऊर्जा प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. सरकारनेही अशा प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय