Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआठ वर्षे 'अच्छे दिन' च्या भुलथापा देऊन मोदींकडून जनतेला 'एप्रिल फुल'-युवक शहराध्यक्ष...

आठ वर्षे ‘अच्छे दिन’ च्या भुलथापा देऊन मोदींकडून जनतेला ‘एप्रिल फुल’-युवक शहराध्यक्ष इम्रान शेख

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोदी सरकार विरोधात प्रतिकात्मक आंदोलन.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१
-“मोदींचा विकास म्हणजे फसवा विकास असून गेल्या आठ वर्षात ‘अच्छे दिन’च्या नावाखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप यांनी भारताच्या जनतेला ‘एप्रिल फुल’ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, महागाईने जनतेला बेजार केले असून अशी परिस्थिती आजवरच्या भारताच्या इतिहासात कधीच नव्हती. आता तर जनता सुद्धा भाजपच्या या अच्छे दिन वर ‘आमचे पुराने दिनच वापस करा’ असं बोलू लागली आहे,” अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.

खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल हा “एप्रिल फुल चा दिवस हा मोदीचा खोट्या विकासाचा वाढदिवस” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी गव्हाणे बोलत होते.



यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले “पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आहे त्या नोकऱ्या गमवायची वेळ देशातील व महाराष्ट्रातील तरुणांवर आली असून पंतप्रधान मोदी आणि भाजप यांनी देशातील तरुणांना एप्रिल फूल केले आहे. ना शिवस्मारक तयार झाले, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना लोकांना पंधरा लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊदला फरफटत आणले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरचे अत्याचार थांबले, ना डॉलर ४० रुपयांचा झाला, ना बाबासाहेबांचे स्मारक तयार झाले आणि ना अच्छे दिन आले! अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना एप्रिल फुल केले आहे. मात्र निवडणुकीत मतांच्या रूपाने भाजपला जनता नक्कीच ‘एप्रिल फुल’ बनवेल, असे इमरान शेख म्हणाले.

यावेळी युवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने “एकच भूल कमळ का फुल, देशाला केले एप्रिल फूल” अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, शाम लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष उमेश काटे, विनायक रणसुंबे, दीपक साकोरे, युवा नेते राहुल पवार, उपाध्यक्ष मंगेश भुजबळकर, राजेंद्र थोरात, विकास कांबळे, मेघराज लोखंडे, शाहिद शेख, संतोष निसरगंध, संदिपान झोंबाडे, युसूफ कुरेशी, अविनाश गायकवाड, दीपक अंकुश, इरफान शेख, शाहिद इनामदार आझर आवटी, मुवाज मुजावर, महेश यादव यांच्यासह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय