कोरोना धुमाकूळ घालतोय तसतसा पडझडीला वेग आला आहे. अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि खरं म्हणजे सबंध मानवजातच कोलमडून गेली आहे. पण बघाना, हे कोलमडनही हरएक माणसासाठी सारखं नाहीये. पर्याय आहेत तिला चकवण्याचे अनेकांकडे. जीवनावश्यक वस्तूही लॉकडावुनच्या काळात मिळणं कठीण झालंय. घरी रोजचं दूध शेजारच्या गावातल्या डेअरीतून घरी यायच. लॉकडावुनमुळे दादाला दुकानं बंद करावं लागलं आणि तिकडे रोज जाण्याचा संबंध उरला नाही. मुलींसाठी दूध तर हवं, मग दूध पावडरचा पर्याय निवडला. फारसं काही अडून पडलं नाही. दिवसाआड कसली ना कसली भाजी गावात येतेच ती घ्यायची किंवा बरेच कडधान्य घरात आहेत त्यावर भागवायचं. पण कांदे संपायला आल्यावर अडचण होईल असं वाटायला लागलं. कांद्याचा वापर कमी करून शेंगदाना कुट उपयोगात आणला जाऊ लागला. कांदा संपायच्या आत दुसरे कांदेही मिळाले. गावात पण बरंसचं वातावरण असंच आहे. म्हणजे पोटाची चिंता तर सगळ्यांनाच आहे पण उपासमारीची वेळ काही काळ थांबवता येऊ शकेल अशी तर निश्चितच परिस्थिती आहे. नाहीच काही मिळालं तर भात शिजवून काढू दिवस. आहेत कणगी भरून भाताची, अशी चर्चा ओट्यांवर नक्की ऐकायला मिळेल. भूक तर सगळ्यांच प्राणी मात्रांची गरज आहे. मात्र माणूस म्हणून शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराचे प्रश्न मोठे अवघड झालेत. पण या पातळीवरच्या चर्चा त्यांच्यात कुठं होताना दिसत नाहीत. तसे प्रश्न समजून घ्यायची त्यांची समज नाही किंवा सध्या त्यांचा तो प्राधान्यक्रम नाही.
कोरोनवर गप्पा करता करता बायका वाळवणीचे पदार्थ करण्यात गुंतल्या आहेत. कुरडया, पापड्या, शेवया नी काय काय. पुरुषांना आणि तरुण मुलांना घराबाहेर एखादी चक्कर तर नक्कीच मारता येते. दीड जीबी डेटा असतो रोजचा. चॅट करता येते, युट्युब आहेच. रात्रीचं जेवण करून टीव्हीसमोर अंग टेकताच, एरवीच्या आठवणींमध्ये असलेला रामायण पर्वाचा काळ पुन्हा अनुभवण्याची व रामराज्याच्या कल्पनांमध्ये रमण्याची सोय भारत सरकारने उपलब्ध करून दिली आहे. हे करताना आबालवृद्धांच्या आवडीची खास दखल घेण्यात आली आहे. गंभीर आजार रोखण्याची कसरत त्यात नागरिकांच्या अवडीनिवडीचं भान ठेवणं, किती करतंय हे सरकार. म्हणजे आपल्या भारतीय समाजाच्या उत्सवप्रियतेला बाधा पोहचू नये म्हणून अधेमध्ये वेगवेळ्या इव्हेंटच्या आयडिया दिल्या जातात. थाळ्या, दिव्यांच्या इव्हेंटद्वारे नागरिकांचे एकमेकांशी भावनिक बंधही मजबूत करतय सरकार. शिवाय या काळात जीव दावणीला लावून सेवा देणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत या सत्कर्माचे पुण्यही नागरिकांच्या गाठी फ्री मध्ये बांधता येईल याचीही दक्षता घेतंय सरकार. सांगा आजच्या काळात कोण करतंय हो एवढं. सत्कर्माच्या, पुण्याच्या, एकजूट दाखवण्याच्या संधी इतकंच काय बालपणात पुन्हा रमण्याची संधी सुद्धा दिलीये. लॉकडावुनमध्ये घरात बसल्या बसल्या बोर होऊ नये म्हणून शक्तिमान पहाता येण्याची संधीही मिळाली आहे. पालकांना आपल्या बालपणीचा काळ अनुभण्याची संधी. बालक पालक दोन्हीही घटक शक्तिमान मस्त एन्जॉय करू शकतात.
आमच्या इथं रोजच्या रोज पाणी येतं. त्यामुळे भागदौड तशी नाहीच. पण अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यांचं कसं होतं असेल? सुरक्षित अंतर विहिरीतून पाणी ओढताना कसं राखत असतील नाही माहीत. शेतीची कामं खोळंबली आहेत. उन्हाळ्यात गावांमध्ये घरं बांधणी जोरात असते ती थांबली आहे. लग्नाचा सिझन धडाक्यात सुरू झाला होता. अनेकांचे साखरपुढे झाले होते, लग्नाच्या तारखा निघाल्या होत्या पण कोरोनाने मध्येच लॉकडावुनचा खोडा घातला. मुली बघण्याचे कार्यक्रम रद्द करावे लागले. आता चॅट आणि गप्पा एवढाच पर्याय शिल्लक आहे सद्या. काहींच्या चुली बंद पडण्याचा मार्गावर आहेत. काहींच्या चुलीत थोडी धुगधूगी आहे जी अजून काहीकाळ पोटाची भूक शिजवू शकेल. इकडचा ग्रामीण भारताचा एक तुकडा सद्याचं डॉकडावुन असं जगतोय.
शहरातील उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय मस्त कॉलिटि टाईम स्पेन्ड करत आहेत आपल्या फॅमिलीसोबत. त्यांच्याकडेही गॅस, ओव्हन, मायक्रोव्हेव, गिझर, टीव्ही, एसी आणि मोबाईल मधील रोजचा डेटा व्यवस्थित सुरू असेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडेही कॉरन्टाईन स्पेशल रेसिपीजची रेलचेल सुरू असेल याचीही खात्री आहे. काही मंडळी टाटांच्या कौतुकात व्यस्त असतील, काही मुस्लिमांवर खार खात असतील घरी बसून. काही चिनी वस्तूंवर निर्बंध टाकण्याची ऑनलाइन चळवळ मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉपसारख्या चिनी बनावटीच्या वस्तूंच्या स्क्रीनवर चालवत असतील. अर्थात हे माझे मनाचे आराखडे आहेत त्यांच्याबद्दल.
तर रोजच्या सकाळी लॉकडावुनचा कितवा दिवस आहे याचे अपडेट मोबाईलवर येतात. कोरोनाचे लेटेस्ट अपडेट देणारं किती काय काय आहे. ‘आज की सबसे बडी खबर, कोरोना से जुडी और बाते जानने के लिये हमारे साथ जुडे रहिये’ च्या आरोळ्या ठोकणारे बातम्यांचे चॅनल्स, व्हाट्सएप, फेसबुक नी आणखी बरंच काय काय. सगळीकडे कोरोनाच आहे पण अपवाद सोडले तर सांगणारे अर्ध सत्यच सांगत आहेत. तिथं विझलेल्या चूल्ही नाहीत, चालून झिजलेली पावलं नाहीत, रांगेत थांबून मूठभर भातासाठी उन्हात तिष्ठत पडलेली भूक नाही, आधारकार्ड, रेशनकार्डशिवाय रस्त्यावर भुकेकंगाल जिंदगी जगणाऱ्या आणि आता लॉकडावुनमुळे मृत्यूपंथाकडे निघालेला मागास, भुकेला, फाटका- तुटका वर्ग नाही, सुन्न झालेल्या रस्त्यांवर गरम डांबर तुडवत रितंपन घेऊन खिन्नपणे आपल्या गावच्या घराकडे निघालेला आक्रोश नाही. मग पाहू वाटतं नाही बातमीच्या नावाने केली जाणारी तथ्यहीन बकबक.
आज सकाळी रोजचे अपडेट पाहावे म्हणून सवयीने प्राईम टाईम लावला. नाष्टा करता करता बघून घ्यावं म्हणून. रविश कुमार दिल्लीतील मजुरांची वेदना दाखवत होते. आजीने बहीणीच्या आवडीखातर गोड पुऱ्या बनवल्या होत्या रात्री. तीच खात होते. स्क्रीनवर बांधकामगार महिला तिच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीसह होती. जमिनीवर झोपलेली इवलीशी ती, तिच्यावर घोंवणाऱ्या माशा, दोन दिवसांतून एकदाच जेवू शकणारी तिची आई. नवरा बायको दोघेही उपाशी. ती विचारते इला मी दूध कसं पाजू? तिचा तो आर्त सवाल काळीज चिरत गेला. ज्या आईला दोन दिवसांत एकदा जेवण मिळत असेल तीला दूधच कसं असणार? कसं जगेल ते लेकरू. घशाच्या खाली काही उतरण शक्यच नव्हतं. दुधाकरिता डिंकाचे लाडू, सुक्या मेव्याचे लाडू, साजूक तुपाची धार असणारे मऊ सूत जेवण, तेलाची मालिश, खारीक खोबरं, शरीराला शेक असे पर्याय असलेल्या स्तनदा माता. तर वेगवगळी खेळणी, लेकराला नवनवे ब्रँडेड कपडे, स्किन फ्रेंडली बेबी प्रोडोक्स निवडण्यासाठी दक्ष असणारा नव्यानेच बाप झालेला माणूस. किती विरोधी दोन टोक पालकत्वाच्या एकाच भावनेची. आई-बाप होण्याची भावना एकच पण त्यानंतरचा आनंद जगता येण्याची कोणतीच सोय नाही त्यांच्याकडे. उपासमारीने लेकराला दूध पाजू न शकणारी आई कसं निभावत असेल तिचं आईपण? हे प्रश्न आजचे नाहीत पण कोरोनाच्या साथीने ते गडद झाले आहेत. स्तनदा मातांसाठीच्या योजना तिच्यापर्यंत आजही पोहचल्या नाहीत ती दिल्लीत असून सुद्धा. जिथं त्या आहेत त्यातील तरतुदी पुरेशा तरी कोठे आहेत? अन्नाचा पर्याय उरलाच नाही म्हणून गवत खाणारी माणसं या देशात अचानक तयार नाही झाली. ती माणसं कधी आपल्या धोरणांच्या केंद्रस्थानी आलीच नाही. भाजीच्या जुडीत नुसती गवताची एखादी काडी सापडली तर भाजीवाल्यासह शेतकऱ्यालाही शिव्यांची लाखोली वाहनाऱ्यांनी गवत खाऊन पहावं असं मी म्हणणार नाही. पण किमान विचार तर कराल. गवत खानं हा कोणाचाही भूक भागवण्याचा पर्याय कसा असू शकतो?
खरं तर कोरोनाने आपली चिक्कार फाडतोड केली आहे. आपला दिखाऊ चकचकीत रंगवलेला चेहरा टारकन फाडला आहे. कुपोषित चेहऱ्याला रंग लावून बसलो होतो आपण. काय त्या बाता आपल्या विकासाच्या. भले भले पुतळे, मोठे मोठे रस्ते, रंगीबेरंगी मॉल, टोलेजंग इमारती, मेट्रो काय, बुलेट ट्रेनच्या बाता काय, स्मार्ट सिटी काय? आणि आता या स्मार्ट सिटी असणाऱ्या शहरांमधील सरकारी दवाखान्यात साधे पुरेसे सॅनिटायझर नाहीत. ही धोरणलकव्यामुळे आलेली अधोगती असली तरी, ही सार्वजनिक व्यवस्था अधोगतीला जाण्यासाठीच कमकुवत धोरणे जनतेच्या माथी मारली जात आहेत किमान एवढं तरी या साथीतुन लोकांनी शिकावं.
महत्वाचं म्हणजे मला सकाळी काही वाटलं त्याबद्दल मी रात्री लिहून मोकळी झाले. काही झालं नाही तर चार दोन लोकं नक्की वाचतील. त्यांना समजेल माझी मनोवस्था. पण ज्यांच्याकडे फेसबुकवर व्यथा मांडून लाईक्स मिळवण्याची, स्टेट्सला काही ठेवण्याची सोय नाही. मोबाईल नाही, डेटा नाही. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या जागेत ज्यांची दुखणी प्रकाशित होण्याची कुठलीच शक्यता नाही. कुठलाही कॅमेरा त्यांच्याकडे फिरणारच नाही. म्हणून त्यांचे प्रश्न आणि ते आपले कोणीच नाहीत का? हा देश, ही देशातील व्यवस्था त्यांच्यासाठी नाहीच का? या लॉकडावुनमध्ये सगळं बंद असलं तरी मेंदूला चालना द्या, माणसांशी मानसांसारखंच वागणाऱ्या समजव्यवस्था, शासनव्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी किमान विचार तर करा.
– रोहिणी नवले
भंडारदरा, ता. अकोले
जि. अहमदनगर