(तालखेड/प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळात जी रस्त्याची दैयनिय अवस्था होती ती स्वातंत्र्य मिळाल्याच्या सत्तर वर्षानंतरही तालखेड ते येळा तांडा, जामगा तांडा,इर्ला रस्त्याची असल्याने येथील नागरिकांना या रस्त्यावर गुडघेइतक्या चिखलातून जावे लागते. गरोदर मातेला याच रस्त्याने वाहन जात नसल्याने उचलून नेण्याची वेळ येत आहे. गेल्या 20 वर्षांपासून माजलगाव व गेवराई या दोन्ही तालुक्याच्या पुढार्यांकडे मागणी, निवेदन वेळोवेळी मोर्चे काढूनही साधा या रस्त्यावर मुरुमही पडला नाही.
तालखेड येथील इर्ला हा रस्ता माजलगाव तालुक्यात येतो तर त्याला मतदारसंघ गेवराई आहे. निवडणुकीच्या काळात गेवराईचे पुढारी येथे येऊन आश्वासने देतात. तर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगावचे पुढारी केवळ या रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात आजही या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल आहे. गेवराईतून तत्कालीन आमदार बदामराव पंडित, अमरसिंह पंडित यांनी तालखेड ते इर्ला हा रस्ता करण्याचे येथील नागरिकांना आश्वासन दिले होते मात्र अद्यापही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. माजलगावचे प्रकाश सोळंके यांनी देखील नागरिकांना आश्वासने देऊन झुलवत ठेवले.
गेल्या पंचवार्षिकला आ. लक्ष्मण पवार यांनी देखील तालखेड-येळा-जामगा ते इर्ला तांडा हा रस्ता मी निवडून आल्यावर करतो, असे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. त्यानंतर ते दुसर्यांदा आमदार झाले तरीही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. येळा-जामगाव व इर्ला या तीन तांड्यांसाठी दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे. येथील नागरिकांना आरोग्यासह इतर सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक वेळा नागरिकांनी आंदोलने केली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.