कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे हे भारतीय शेतकरी नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते संयुक्त किसान मोर्चा (SKM)च्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी २०२०-२१च्या दिल्लीतील आणि देशभरातील ऐतिहासिक संयुक्त किसान संघर्षाचे नेतृत्व केले आणि केंद्र सरकारला तीन कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडले. मार्च २०१८ मध्ये AIKSच्या नेतृत्वाखालील नाशिक ते मुंबई अशा ५०,००० शेतकऱ्यांच्या सुप्रसिद्ध किसान लाँग मार्चच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
ते भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे १९९८ पासून केंद्रीय कमिटी सदस्य आहेत आणि २०२२ पासून पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आहेत. २००५ ते २०१५ अशी दहा वर्षे ते भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे महाराष्ट्र राज्य सचिव होते.
१९८० व १९९०च्या दशकात महाराष्ट्रातील हजारो युवक युवतींना मार्क्सवादी विचारांची प्रेरणा देऊन शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर विद्यार्थी, युवकांची SFI/DYFI च्या माध्यमातून मोठी चळवळ उभारणारे डॉ. अशोक ढवळे आजही आमचे स्फूर्तिस्थान आहे.
पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता
डॉ. अशोक ढवळे यांनी १९७८ मध्ये मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सक्रिय प्रवेश केला. १९८० मध्ये त्यांची बॉम्बे युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली. नंतर त्यांची १९८० ते १९८८ या काळात महाराष्ट्रातील एसएफआयचे राज्य सरचिटणीस म्हणून निवड झाली. १९८१ ते १९८९ या काळात ते या विद्यार्थी संघटनेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. विद्यार्थी जीवनानंतर ढवळे युवा चळवळीत सक्रिय झाले, आणि १९८९ ते १९९५ दरम्यान डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे राज्य सरचिटणीस, नंतर राज्य अध्यक्ष आणि अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
शेतकरी नेते
१९९३ पासून डॉ. अशोक ढवळे यांनी AIKS च्या उत्तुंग नेत्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय किसान सभेत काम करण्यास सुरुवात केली. २००१ ते २००९ पर्यंत ते AIKS चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस होते. २०१७ मध्ये हरियाणा येथील हिसार येथे झालेल्या AIKS च्या ३४व्या राष्ट्रीय परिषदेत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि २०२२ मध्ये केरळ राज्याच्या त्रिचूर येथे झालेल्या ३५व्या राष्ट्रीय परिषदेत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाली.
त्यामुळे ते क्रांतिसिंह नाना पाटील आणि गोदावरी परुळेकर यांच्यानंतर AIKS चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले महाराष्ट्रातील तिसरे नेते बनले. AIKS ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे.
भारतातील २७ राज्यांमधील सुमारे १५ दशलक्ष शेतकरी किसान सभेचे सदस्य आहेत. डॉ. अशोक ढवळे यांनी भारतातील कृषी संकटाविरुद्ध अनेक संघर्षांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांना किमान आधार भाव (एमएसपी) चे अधिकार आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी वन हक्क कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी लढा दिला. जून २०१७ मध्ये, ते महाराष्ट्रातील ११ दिवसांच्या संयुक्त शेतकरी संपाच्या नेत्यांपैकी एक होते, ज्याने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी मिळवून दिली. मार्च २०१८ मध्ये २०० किमी लांबीच्या ५०,००० शेतकऱ्यांच्या विशाल किसान लाँग मार्चचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये ते एक प्रमुख होते. किसान सभेच्या बॅनरखाली नाशिक ते मुंबईच्या मार्चमध्ये हजारो महिलांचाही समावेश होता. सात दिवस पायी चालत वन हक्क कायदा लागू करावा आणि डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शेतकरी आयोगाने शेतकऱ्यांना त्यांच्या सर्वसमावेशक किमतीच्या दीडपट एमएसपी देण्याची शिफारस केली होती ती लागू करावी, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी पेन्शनची सोय करावी, या प्रमुख मागण्या होत्या.
डॉ. अशोक ढवळे हे संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. २०२०-२१ मधील तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक वर्षाच्या प्रदीर्घ शेतकर्यांच्या संघर्षाचे त्यांनी सामूहिक नेतृत्व केले. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची केंद्र सरकारशी अंतिम वाटाघाटी करणाऱ्या SKM च्या पाच सदस्यीय समितीच्या सदस्यांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली. ते अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या (AIKSCC) कार्यगटाचे सदस्य देखील आहेत, ज्यांनी २०११७ आणि २०१८ मध्ये दिल्लीत संसदेपर्यंत प्रचंड शेतकरी मोर्चे आयोजित केले होते.
कम्युनिस्ट राजकारण
डॉ. अशोक ढवळे १९७८ मध्ये भारतचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले. ते १९९८ पासून सीपीआय(एम)च्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत आणि एप्रिल २०२२ मध्ये केरळमधील कन्नूर येथे झालेल्या पक्षाच्या २३व्या काँग्रेसमध्ये ते सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोमध्ये निवडून आले आहेत. येथे पुन्हा, बी. टी. रणदिवे आणि एम. के. पंधे यांच्यानंतर सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोमध्ये निवडून आलेले ते महाराष्ट्रातील तिसरे नेते आहेत. २००५ ते २०१५ पर्यंत त्यांची महाराष्ट्रात सीपीआय(एम) चे राज्य सचिव म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक लढे सुरू करण्यात पुढाकार घेतला आणि सर्व डाव्या, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष शक्तींचे ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.
प्रेरणादायी साहित्य लेखन
डॉ. अशोक ढवळे हे इंग्रजी आणि मराठी भाषेतील विपुल लेखक आहेत. दहा वर्षे ते सीपीआय(एम) महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ‘जीवन मार्ग’चे संपादक होते. ते आता सीपीआय(एम) च्या केंद्रीय सैद्धांतिक त्रैमासिक ‘द मार्क्सिस्ट’ च्या संपादक मंडळावर आहेत. सीपीआय(एम) केंद्रीय साप्ताहिक ‘पीपल्स डेमॉक्रसी’ आणि ‘लोकलहर’ आणि इतर नियतकालिकांमध्ये ४० वर्षांहून अधिक काळ ते नियमित योगदान देत आहेत. ‘व्हेन फार्मर्स स्टुड अप – हाऊ द हिस्टोरिक किसान स्ट्रगल इन इंडिया अनफोल्डेड’ या देशव्यापी शेतकरी संघर्षावरील त्यांचे नवीन पुस्तक, लेफ्टवर्ड बुक्सने २०२२ मध्ये प्रकाशित केले. ‘द किसान लाँग मार्च इन महाराष्ट्र’, ‘शहीद भगतसिंग – एक अमर क्रांतिकारक’, ‘कॉम्रेड गोदावरी परुळेकर – जन्मशताब्दी श्रद्धांजली’, ‘चीन – काल, आज, उद्या’ ही त्यांची काही पूर्वीची पुस्तके आहेत. इतर अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र आज देशपातळीवर असले तरी आजही महाराष्ट्रातल्या विविध तालुक्यात संघर्ष व शिबिरांसाठी त्यांचे नियमित दौरे असतात.
या जन्मदिनी कॉम्रेड अशोक ढवळे यांना अगणित शुभेच्छा !
क्रांतिकुमार कडुलकर –
माजी राज्य समिती सदस्य
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(DYFI)