मुंबई : आज सकाळीच्या दरम्यान नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. नौदलाने या संशयास्पद बोटीची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना दिली. ही बोट पाकिस्तान (Pakistan) मधून आल्याचे बोलले जात होते. यासोबतच बोटीवर काही पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता प्रकरणाची महत्वाची माहिती समोर येत आहे.
मुंबईत झालेल्या 26-11 च्या हल्ल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेबाबत पोलीस विभाग तसेच नौदलाकडून मोठी खबरदारी घेतली जाते. 26-11 च्या हल्ल्यातील दहशतवादीदेखील समुद्री मार्गाने आले होते. त्यामुळे ही संशयास्पद बोट आढळल्यानंतर तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्टवर आल्या होत्या. आता हि बोट पाकिस्तानी किंवा संशयास्पद नसल्याचे समोर आले आहे.
सदरची जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची असून दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे. यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, असे कोलासो यांनी सांगितले. सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटीशी संपर्क साधण्यात आला होता. उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असे कोलासो यांनी सांगितलं.