मोगादिशू : पूर्व आफ्रिकन देश सोमालियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील (Mogadishu) हॉटेल हयातवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला, त्यानंतर गोळीबार करत दहशतवादी हॉटेलमध्ये शिरले. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या ११ तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
वृत्तसंस्था एएफपीशी या घटनेबाबत बोलताना सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत आणि सुरक्षा दलांशी चकमक सुरू आहे. हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर जिहादी गटाचे सैनिक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सुरक्षा अधिकारी अब्दुकादिर हसन यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबार सुरू आहे. विशेष म्हणजे हयात हे मोगादिशूच्या लोकप्रिय क्षेत्रांपैकी एक आहे. येथे अनेक हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये मोठे सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक येत असतात.
अल-शबाब अनेक वर्षांपासून सोमालियामध्ये सरकारविरोधात सक्रिय आहे. सोमालियाच्या दक्षिण आणि मध्य भागात या दहशतवादी संघटनेचे बऱ्यापैकी नियंत्रण असल्याचे सांगण्यात येत आहे.