Friday, May 3, 2024
Homeजिल्हामुलभूत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही - डॉ. ज्ञानेश्वर मोटे

मुलभूत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही – डॉ. ज्ञानेश्वर मोटे

जुन्नर : सरकारी क्षेत्रातील रोजगाराची जागा कंत्राटी पध्दतीने घेतली आहे, तर खाजगी क्षेत्रातही मानवी श्रमाची लूट करणारे धोरण राबवले जात आहे. तसेच शिक्षणाचा दर्जा खालावला असून रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही, अशा परिस्थितीत विद्यार्थी, युवकांनी एकजूट होऊन चांगले शिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जन आरोग्य मंचाचे डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी केले.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 20 ऑगस्ट व 21 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या 27 व्या पुणे जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस एफ आय चे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी होते. अधिवेशनाची सुरुवात श्री शिव छत्रपती महाविद्यालय ते तांदूळ बाजार मार्गे बारव ते आदिवासी प्रबोधनी अशी संविधान जनजागृती रॅली काढून झाली.

डॉ. मोटे पुढे बोलताना म्हणाले, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आता आपल्या देशभक्ती शिकवत आहेत. आणि आपला समाज अंधश्रद्धेत गुंतला असताना धर्मांधतेचे, जातीयतेचे राजकारण करून धार्मिक द्वेष पसरविला जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय संविधानातील मूल्य, तत्त्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी तरूणांवर आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम.एम. कलबुर्गी यांची साहित्यिक, विचारवंत, लेखक, पत्रकारांची निर्घृण खून केला जातो, ही आपल्या देशाचे दुर्दैव आहे. अशा परिस्थितीत धर्मांधर्मातील, जातींजातींमध्ये तेढ संपुष्टात आणण्यासाठी लढण्याची गरज आहे.

एस एफ आय चे राज्य सहसचिव मलेशम कारमपुरी म्हणाले, केंद्र सरकारने अग्निपथ नावाची योजना आणून लष्कराचे खाजगीकरण करण्याचे कारस्थान केले आहे. यामुळे लाखो कायमस्वरूपी नोकरी मिळणाऱ्यांना युवकांना अग्निपथ सारख्या भंपक योजनेमध्ये काम करावे लागणार आहे. 4 वर्षांनंतर पुन्हा त्या युवकांवर बेरोजगारी कुऱ्हाड कोसळणार आहे.

किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे म्हणाले, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून केंद्र व राज्य सरकारने नोकरीच मिळणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, विद्यार्थी, युवक एकजूट मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी एस एफ आय चे राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे यांनी संबोधित केले. एस एफ आय चे पुणे जिल्हा अध्यक्ष रवी साबळे यांनी प्रास्ताविक केले, तर सुत्रसंचलन व आभार अक्षय निर्मळ यांनी व्यक्त केले. यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष अक्षय साबळे, सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, सचिव समीर गारे, रूपाली खमसे, भार्गवी लाटकर, दत्ता साळोखे, मिनाक्षी शिंदे, निशा साबळे, सुवर्णा साबळे, अतुल मुंढे, अभिषेक शिंदे, रोहिदास फलके, रोशन पेकारी, भूषण पोकळे, दिपक बगाड, सपना मेमाणे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय