पिंपरी चिंचवड : अमोल तुकाराम भालेकर आणि शिवयोद्धा प्रतिष्ठाण यांच्यामार्फत रुपीनगर येथे १० वी आणि १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि करिअरच्या वाटा या विषयावर मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
रुपीनगर, तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप विद्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. मार्गदर्शक म्हणून उमेश कुदळे, B pharm, MBA, MA(History), राज्यात MPSC परीक्षेत प्रथम आणि संदीप आरगडे सर, (B. Sc. Maths, MCA) साई अकॅडमी पुणे हे लाभले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमोल भालेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला. “सध्या १० वी आणि १२ वी नंतर शिक्षणाच्या आणि करिअरच्या विविध वाटा आणि पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधींना मुकावे लागते. रुळलेल्या वाटा न चोखळता, इतर अनेक पर्याय शोधले पाहिजेत. त्यातून करिअरच्या अनेक आकर्षक संधी उपलब्ध होतील. गरीब घरातून, कष्टाने, अभ्यासातून चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन योग्य मार्ग निवडून यशस्वी व्हावे. हीच हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भावना आहे आणि अशा गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागेल ती मदत करायची माझी तयारी आहे.आपणासं कुठल्याही प्रकारचे सहकार्य लाभल्यास निसंकोच माझ्याशी संपर्क साधावा.”
उमेश कुदळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,” करिअर ही एक इमारत आहे, ती मजबूत करायची असल्यास आपला पाया भक्कम करावा लागतो, त्यासाठी आधी आपली आवड कशात आहे ते निश्चित करून त्या क्षेत्रात पुढे जायचा पर्यटन केला पाहिजे. त्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आपण जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रांत तुम्ही सर्वोत्तम असले पाहीजे व त्यामधील कौशल्य तुमच्याकडे असले पाहिजे, मग यश तुमच्या पायाशी येणारच. “भविष्यात कोणकोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी काय तयारी करावी लागेल याबद्दल मार्गदर्शन केले.
संदीप आरगडे यांनी स्पर्धा परीक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रसंगी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष भागवत चौधरी, सचिव शांताराम दगडु भालेकर, सहसचिव सुर्यकांत भसे , दशरथ जगताप, प्राचार्य सुबोध गलांडे, मुख्याध्यापक रोहिदास शिंदे, आदर्श शिक्षक गोवर्धन चौधरी, बर्गे मॅडम, गजाजन वाघमोडे, के.डी.वाघमारे, गौतम दळवी, भास्कर कुलकर्णी, आशिष गौंड, तुकाराम भालेकर, सुनिल गारगोटे उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यात शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी कष्ट घेतले. सुत्रसंचालन शिवव्याख्याते प्रसाद डफळ यांनी केले. अमोल भालेकर यांनी आभार मानले.
– क्रांतिकुमार कडुलकर