Friday, May 17, 2024
Homeजिल्हाराज्यभरातील ७८ हजार आशा ३६०० गटप्रवर्तक पुन्हा संपावर जाणार!

राज्यभरातील ७८ हजार आशा ३६०० गटप्रवर्तक पुन्हा संपावर जाणार!

नाशिक : आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय न काढल्यामुळे दि. २९ डिसेंबर २०२३ पासून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले. तसेच मंजुर केलेल्या मागण्यांचा जि.आर. दि. १२ जानेवारी २०२४ पूर्वी न काढल्यास दि.१२ जानेवारी २०२४ पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे सत्तर हजार आशा स्वंयसेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८ ऑक्टोबर २०२३ ते दि.०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभुमीवर संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृति त्तमितीसोबत बैठक घेतली होती. सदर बैठकीत आरोग्य मंत्री यांनी निर्णय घेण्याची घोषणा केली होती.

१) आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार, २) आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ, ३) गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री यांनी दि.०१ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृति समितीला दिले होते. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांना अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता मा. नरहरी झिरवळ, उपाध्यक्ष विधानसभा, म.रा. यांनी मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी मा. अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक खा. हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरुन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरुन १०००० रुपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत केल्याचे जाहीर केल्यामुळे दि. १० नोव्हेंबर २०२३ पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. तसेच आ. भा. कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवाय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत. संप स्थगीत होवुन दीड महिना होवुन गेला परंतु अदयाप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपुरच्या हिवाळी अधिकवेशनात आयटक वतीने दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत चालली आहे. त्यामुळे दि. २९ डिसेंबर २०२३ पासून ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक बहिष्कार टाकत आहेत, असेही राजू देसले यांनी सांगितले. 

आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबतीत खालील प्रमाणे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

१. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु.२००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार.

२.आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ

३.गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.१०००० ची वाढ

वरील मंजुर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय दि.१२/०१/२०२४ पूर्वी निर्गमित करण्यात यावेत. अन्यथा दि.१२/०१/२०२४ पासुन राज्यातील सर्व आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय