मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये भीषण दुर्घटना झाली आहे. मेक्सिको सिटी मेट्रोचा एक पूल कोसळला असून मोठा अपघात झाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मेट्रो ट्रेन पुलावरुन जात होती. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात २० लोकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं.
ही भीषण दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये मेट्रो पूल रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांवर कोसळताना दिसत आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. मेक्सिको सिटीच्या मेयर क्लॉडिया यांनी १५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचं नुकसान झालं असल्याची माहिती होती. दरम्यान ४९ लोक जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
परराष्ट्रमंत्री मार्सेलो एबरार्ड मेक्सिको सिटीचे मेयर असताना मेट्रोच्या या लाईनचं काम करण्यात आलं होतं. ट्विट करत त्यांनी ही अत्यंत भीषण दुर्घटना असल्याचं सांगत पीडितांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई केला जाईल असंही ते म्हणाले आहेत. मदतीसाठी जे काही लागेल ती करण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.