Saturday, May 18, 2024
HomeNewsराज्यातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीमध्ये जस्ताची कमतरता; दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमीच

राज्यातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीमध्ये जस्ताची कमतरता; दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमीच

महाराष्ट्रातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्ताची कमतरता दिसून आलेली आहे. लोह व ‘बोरॉन’ आणि दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने गंधकाचीसुद्धा कमतरता काही प्रमाणात दिसून आलेली आहे.राज्यात नुकताच केलेल्या कृषी विभागाच्या सर्वेक्षण व माती परीक्षणानुसार सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याचे आढळून आले. पिकांच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.

शेतात पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाद्वारे मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याचप्रमाणे सामू, विद्युत वाहकता, चुनखडीचे प्रमाण समोर येते. त्यावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरवता येतात. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सोबतच सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची गरज असते. सध्याच्या शेती पद्धतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर, पीक फेरपालट न होणे, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत वापर आदींमुळे जमिनीत सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता दिसून येते. पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असून त्याच्या योग्य वापरातून पीक उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुधारतो, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय