Friday, November 22, 2024
Homeक्रीडाविश्वव्हिडिओ: अर्शदीप सिंगने सलग चेंडूंवर मधल्या स्टंपचा केला भुगा...मुंबईचा पराभव

व्हिडिओ: अर्शदीप सिंगने सलग चेंडूंवर मधल्या स्टंपचा केला भुगा…मुंबईचा पराभव

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला वानखेडे स्टेडियमवरील सामना जबरदस्त चुरशीचा झाला.पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा चोपून मुंबईसमोर २१५ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मा, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड यांनी ज्या प्रकारे खेळ केला, ते पाहून मुंबईचा विजय पक्का, हेच MI फॅनच्या मनात होते. पण, अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) अखेरच्या षटकात मुंबईकरांच्या स्वप्नांचा चेंदा-मेंदा केला. त्याचे ते दोन चेंडू मॅचला कलाटणी देऊन केले अन् अम्पायर्सना कामाला लावणारे ठरले. तिलक वर्मा व नेहाल वधेरा यांचा अर्शदीपने मधला स्टम्प उडवला. नुसता उडवला नाही तर त्याचे दोन तुकडेच झाले… हे तुकडे होताना पाहून मुंबईचे फॅन्स मात्र रडू लागले.



सॅम करन ( ५५) व हरप्रीत भाटीया ( ४१) या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले व ९२ धावांची भागीदारी केली. पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले होते. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. इशान किशन ( १) लगेच माघारी परतला. कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा ( ४४) यांनी MIची खिंड लढवताना ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने ग्रीनसह ३६ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. ग्रीनने ४३ चेंडूंत ६७ धावा ( ६ चौकार व ३ षटकार) चोपल्या. सूर्यकुमारने फटकेबाजी कायम राखताना २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या.

टीम डेव्हिड १३ चेंडूंत २५ धावांवर खेळत होता. ६ चेंडूंत १६ धावा असा असताना डेव्हिडने एक धाव घेत तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवला. त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे झाले. पुढच्याच चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून अर्शदीपने नेहाल वधेराच्या स्टम्पचे दोन तुकडे केले. मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला. अर्शदीपने ४-०२९-४ अशी जबरदस्त गोलंदाजी केली.

संबंधित लेख

लोकप्रिय