पुणे: पुण्यात आतापर्यंत कोरोनाने ६ हजार ४९८ रुग्ण दगावले आहेत. त्यात एकट्या ससून रुग्णालयातच अडीच हजार रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. शहरात आतापर्यंत ६ हजार ४९८ जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. पुणे शहरातील एकूण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयातील असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. ससूनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण दगावण्यामागे कारणही आहे. ससून रुग्णालय राज्यातील जुन्या रुग्णालयांपैकी एक आहे. तसेच जिल्ह्यातील हे सर्वात मोठं रुग्णालय ही आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये येतात. कोरोना झालेला प्रत्येक रुग्ण ससूनमध्येच येत असल्याने या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. विशेष म्हणजे अंतिम स्टेजला असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी ससूनमध्ये पाठवलं जातं. त्यामुळे या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ससूनमध्ये आतापर्यंत दगावलेल्या अडीच हजार रुग्णांपैकी ६०० जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती समोर आली आहे. उशिराने येणारे रुग्ण आणि अति गंभीर अवस्थेत आलेले रुग्ण यामुळे या रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सध्या ससूनमध्ये सध्या ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल ५५ जणांचा मृत्यू
दरम्यान, पुण्यात काल दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. मात्र कोरोना बळींचा आकडा काही कमी होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी विध्वंसक ठरत आहे. येथे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात बाधितांचा आकडा ७९६६४५ वर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत एकूण ६८००६७ जण कोरोनामुक्त झालेयत. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे ९०२० जणांचा मृत्यू झाला असून सध्या १०७५०३ सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे राज्यात रविवारी ६६१९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात तब्बल ८३२ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर काल ६१,४५० जण कोरोनोमुक्त झाले.
पशुवैद्यकीय दवाखाने आणि डॉक्टर अत्यावश्यक सेवेत
दरम्यान, पशुवैद्यकीय दवाखान्यांचा आणि डॉक्टरांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोव्हीड १९ च्या सर्व नियमांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याच्या राज्य सरकारला केंद्राने सूचना केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात पशुंना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय पशुवैद्यक विभागानं परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करणारे कर्मचारी, खाजगी पशुवैद्यक डॉक्टर आणि पशुपालन केंद्रातील कर्मचाऱ्यांचा आता अत्यावश्यक सेवेतील यादीत समावेश झाला आहे.