नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नाशिकमधील रामकुंड येथे जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच काळाराम मंदिरात नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात पोछा घेऊन साफसफाई केली.पण, पंतप्रधानांना साफसफाई करावी लागली याचा अर्थ सरकारने साफसफाईच्या नावाखाली फक्त लाखो रुपये उधळले की काय? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
यावर संजय राऊत यांनी सोशल मिडीयावरील एक्स या ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसांपासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्टने देखील सफाईवर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते.
या ठिकाणी फरशीवर अनेक लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉप घेऊन सफाई दर्शन केलेच ! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाईवर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेले, असा टोला त्यांनी लगाविला.