मुंबई : दूध दर वाढीबाबतचा आजचा निर्णय म्हणजे थोडी खुशी थोडा गम, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे राज्य सरचिटणीस व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती चे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
डॉ. नवले म्हणाले, सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रदीर्घ आंदोलनाचा हा विजय आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.
दुसऱ्या बाजूला मात्र असे करत असताना पूर्वी घेतलेल्या निर्णयात बदल करून 3.2/8.3 गुणवत्तेच्या दुधाला 34 रुपये भावाऐवजी आता 3.5/8.5 गुणवत्तेच्या दुधाला 32 रुपये भाव देण्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मागील भावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे. सहकारी संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाही 5 रुपये अनुदान देण्याचा व फॅट/ एस.एन.एफ. डिडक्शन व इंक्रीज रेट प्रति पॉईंट 30 पैसे करण्याचा निर्णय मात्र स्वागतार्ह आहे, असेही डॉ. नवले म्हणाले.