Friday, November 22, 2024
Homeराज्यकौमार्य चाचणी हा विषय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळावा; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

कौमार्य चाचणी हा विषय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळावा; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

पुणे : वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात स्त्रीच्या कौमार्य चाचणीचा उल्लेख करण्यात आली आहे. ती चाचणी अशास्त्रिय असल्याने तो विषय अभ्यासक्रमातून काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री, राज्यपाल व महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले आहे. 

                     

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘जात पंचायत मूठमाती अभियान’ गेल्या नऊ वर्षापासून जात पंचायतच्या मनमानी विरोधात काम करत आहे. अभियानाने काही समाजातील कौमार्य चाचणीच्या अनेक घटना उघड केल्या आहेत. काही घटनांत रितसर गुन्हे दाखल केले आहे.कौमार्य चाचणीचा व चारीत्र्याचा काहीही संबंध नसतो. अगदी खेळतांना,सायकल चालवतांनी, व्यायाम करतांनी स्त्रीच्या गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो, असे प्रबोधन अभियानाकडून केले जाते. मात्र अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम  वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फींगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पिडीत स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासण करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रिय आहे. अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही. कौमार्यता हा खुपच वैयक्तिक विषय आहे. कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते.

कौमार्य चाचणी ही अवैद्यकिय असल्याचे अनेक तज्ञ डाॅक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे. वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डाॅ.इंद्रजित खांडेकर यांना अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठास दिला आहे. जात पंचायत कडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर अंनिसच्या  पुढाकारामुळे सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातुन काढून टाकण्यात यावा अशी मागणी पाटील व चांदगुडे यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय