Friday, November 22, 2024
Homeग्रामीणऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी लक्षात घेऊन या आदिवासी भागातील तरुणांनी सुरु केला अभ्यास...

ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी लक्षात घेऊन या आदिवासी भागातील तरुणांनी सुरु केला अभ्यास वर्ग

(पुणे) :- कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होताना दिसत आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा सुद्धा सुरु होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी आहेत.

         “कुठे नेटवर्क नाहीत तर कुठे लाईट नाही”, “कुणाकडे मोबाईल नाही तर कुणाकडे रिचार्ज नाही”, तर “कुणाकडे फोन सुद्धा नाहीत” असे असंख्य प्रश्न ऑनलाईन शिक्षणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे, हे लक्षात घेऊन शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु राहिलं पाहिजे या हेतूने आंबेगाव तालुक्यातील आपटी या दुर्गम गावात गावाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न मनाशी बाळगलेल्या ग्राम विकास समितीच्या पुढाकाराने अभ्यासवर्ग सुरू करण्यात आल्याचे स्टुडंन्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आणि ग्राम विकास समिती आपटीचे अध्यक्ष अविनाश गवारी यांनी सांगितले.

      या अभ्यासवर्गात गावातील १५-२० विद्यार्थी उपस्थित असतात. त्यांना इंग्रजी, गणित यांसारखे अवघड वाटणारे विषय सोप्या पद्धतीने शिकवणे तसेच सामान्य ज्ञान, शारीरिक शिक्षण, विविध खेळ शिकवण्याचे काम गावातील उच्च शिक्षित युवक करत आहेत. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या इंग्रजी विषयाने अभ्यासवर्गाची सुरुवात केली आहे. इंग्रजी शब्द कसे बनवायचे त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणे व त्यांना दररोज २० शब्द बनवण्यास सांगणे असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे काम या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून होत आहे.

   याला विद्यार्थ्यांचा ही चांगला प्रतिसाद असुन विद्यार्थी उत्सुकतेने गृहपाठ करत आहेत. कोरोनामुळे शाळेत जाऊ न शकलेल्या मुलांमध्ये या अभ्यासवर्गाची आवड निर्माण झाली आहे. यातून गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

      हा अभ्यास वर्ग स्टुडंन्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आणि ग्राम विकास समितीचे अध्यक्ष अविनाश गवारी यांनी सुरु केले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आवटे सर, दिनेश बांबळे, राजेश गवारी तसेच परशुराम गवारी, दत्ता गवारी, रमेश गवारी, संदिप गवारी यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

लोकप्रिय