Sunday, May 19, 2024
Homeकृषीऊस तोड कामगारांचा लढा यशस्वी; १४ टक्के दरवाढ, संप मागे - डॉ....

ऊस तोड कामगारांचा लढा यशस्वी; १४ टक्के दरवाढ, संप मागे – डॉ. डी. एल. कराड

बीड : ऊस तोडणी कामगारांनी दरवाढीसाठी पुकारलेला संप यशस्वी झाला असून आज झालेल्या त्रिपक्षीय बैठकीमध्ये ऊस तोडणी कामगारांना 14 टक्के दरवाढ देण्यात आली. मुकादमाचे कमिशन 19 टक्के करण्यात आले तर ऊस तोडणी कामगारांसाठीच्या कल्याणकारी महामंडळालाही राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी दिली. 

ऊस तोडणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांनी संप पुकारला होता, यामुळे साखर उद्योगांमध्ये पेच निर्माण झाला होता. हा पेच अखेर उलगडला असून आज पुणे येथे झालेल्या साखर संघ राज्य सरकार व ऊसतोडणी कामगार संघटनांच्या संयुक्त बैठकीमध्ये दरवाढीचा करार करण्यात आला. ऊस तोडणी कामगारांना दरवाढ देण्यात आली. यावर्षी ऊस तोडणी कामगारांना 14 टक्के दरवाढ मिळणार असून मुकादमाचे कमिशन ही 19 टक्के करण्यात आल्याची घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली. ऊस तोडणी कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ नोव्हेंबरमध्ये अस्तित्वात येणार असून या महामंडळामध्ये मजुरांची नोंदणी तातडीने सुरू होणार आहे.

ऊस तोडणी कामगारांसाठी अपघात विमा योजना व इतर कल्याणकारी सुविधा या महामंडळामार्फत सुरू होणार आहेत. ऊस तोडणी कामगारांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या असल्यामुळे कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष कॉ. डॉ. कराड, बीड जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके जिल्हा सचिव कॉ. सय्यद रज्जाक यांनी केली. या निर्णयाचे कामगार संघटनेने स्वागत केले असून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

ऊस तोडणी कामगारांच्या दरवाढीचे बातमी मिळताच महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाच्या फडात जाऊन आनंदोत्सव साजरा केला यावेळी संघटनेचे नेते कॉ. बंडूराम गरड, बळीराम भुंबे व ऊस तोडणी कामगार उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय