Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यादारासिंग मन्हास यांच्या संघर्ष आणि यशाची कहाणी

दारासिंग मन्हास यांच्या संघर्ष आणि यशाची कहाणी

Darasingh Manhas : दारासिंग मन्हास हे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील ऑडिट विभागातून एकूण 33 वर्षे सेवा करून वयाच्या 58 व्या वर्षी नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. दारासिंग मन्हास यांनी केवळ कुटूंब आणि नोकरीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी देखील जपत अनेक समाज उपयोगी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. वैयक्तिक आयुष्यापासून ते न्यायासाठीच्या रत्यावरील लढाईतील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.

यानिमित्त दारासिंग मन्हास (Darasingh Manhas) यांच्या संघर्ष आणि यशाची कहाणी

माझा जन्म 26 मे 1966 रोजी आकुर्डी गावठाण पुणे 35 येथे झाला. माझे वडील नसीब सिंग मन्हास मूळचे होशियारपूर जिल्हा पंजाब येथील रहिवासी असून यांनी आर्म फोर्स मिलिटरी मध्ये सेवा केली. ते एक रणगाडा टॅंक ड्रायव्हर होते. मिलिटरीचे आर्मड फोर्स अहमदनगर येथे असल्याने वडील कुटुंबासह आकुर्डी गावात तरटे माडी येथे स्थायिक झाले. वडिलांनी मिलिटरी मध्ये असताना चीन, पाकिस्तान, हैदराबाद मुक्ती तसेच लदाख येथे युद्धामध्ये काम करून देशाचे रक्षण करण्याची सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर ते 12 रुपये पेन्शन वर रिटायर झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कायनेटिक इंजीनियरिंग मध्ये व्हेईकल इंजिनियर म्हणून काम केले.

आम्ही चार भाऊ व एक बहीण आईवडीलांसह भाड्याच्या घरात राहत होतो, वडिलांची एकट्याची तुटपुंजी कमाई असल्याने आमची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. कसेबसे आम्ही जीवन जगत राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत नगरपालिकेच्या आकुर्डी शाळेत झाले. आम्ही चारही भाऊ शिक्षणात खूप हुशार होतो. आठवी ते दहावीपर्यंतचे माझे शिक्षण म्हाळसाकांत विद्यालयात झाले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत 1983 साली मी दहावीत 75 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालो. पुढील उच्च शिक्षण घेणे घरच्या परिस्थितीमुळे अशक्यप्राय होते, परंतु मी दहावीनंतर मिळेल ते काम करून पैसे जमवून नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे ऍडमिशन घेतले.

वास्तविक 1983 साली दहावीत मिळालेल्या मार्कांवर मला पुण्यात कोणत्याही कॉलेजमध्ये इंजीनियरिंग ला प्रवेश सहज मिळाला असता, परंतु घरची अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने इंजीनियरिंगच्या प्रवेशासाठी फीचे पैसे नव्हते आणि अशावेळी ईबीसी चा फॉर्म भरून नेस वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा होती. पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी ते एफ वाय बी कॉम पर्यंत तीन वर्ष पायात स्लीपर व 35 रुपयाचा टी-शर्ट व जाणे येणे रेल्वेने अशा वाईट परिस्थितीत शिक्षण घेतले. 1988 साली बीकॉम होऊन बाहेर पडलो छोटी मोठी टेम्पररी हेल्परची नोकरी केली. (Darasingh Manhas)

1990 च्या दशकात क्रांतीकुमार कडूलकर यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी विद्यार्थी, युवक संघटनेत काम करू लागलो. आकुर्डी सारख्या गावठाणात सार्वजनिक शौचालय, आरोग्य, महापालिकेतील ठेकेदारी, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, रेशनिंग स्वस्त धान्य दुकान, गरीब विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये मोफत प्रवेश, कौटुंबिक प्रश्न, हिंसाचार, हुंडाबळी, प्रस्थापित गावगुंडांची दादागिरी इत्यादी अनेक घटकांवर संघटनेमार्फत काम करून पीडित जनतेला न्याय मिळवून दिला. अनेक आंदोलने केली नव्वदच्या दशकात या संघटनेत स्त्रिया किंवा तरुण मुली संघटनेत सहभागी होत नसत, परंतु आमच्या संघटनेत अनेक तरुण मुली सहभागी होत्या.

1990 च्या दशकात संघटनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात अनेक लोकोपयोगी कामे केल्याने अनेक संघटना व पक्षांनी आम्हाला मदत केली. 1991 साली विद्यमान नगरसेवक शंकरराव पांढरकर यांनी मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिपाई पदावर नोकरी लावली. ग्रॅज्युएशन झाले पण मनासारखी नोकरी मिळत नव्हती, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पालिकेत शिपाई पदाची नोकरी स्वीकारली. 1991 ते 1992 या दोन वर्षात 14 रुपये 85 पैसे या रोजंदारीवर पालिकेत काम केले.

1997 मध्ये मला लिपिक पदावर प्रमोशन मिळाले. सन 1991 ते 97 पर्यंत पालिकेत काम करत असताना पुण्यातील अत्यंत नामांकित ILS Law college मध्ये प्रवेश घेऊन LLB शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी ॲडव्होकेट मनीषा बांगी महाजन यांची खूप मोठी मदत झाली. पालिकेत लिपिक पद ते उपलेखापाल पदावर कर संकलन, कायदा, समाज विकास, जकात, एलबीटी या विभागात काम केले.

पत्नी सोनाली मन्हास यांनी कोरोना महामारीच्या काळात अन्नदान, धान्य बँक, कपडेलत्ते औषधे आणि रोख देणग्या गोळा करून वुई टू गेदर फाउंडेशन सह विविध सेवाभावी संस्थांना गरजू लोकांना खूप मोठी मदत केली, कोणालाही उपाशी राहू देणार नाही ही कोरोना काळातील त्यांच्या टीमचे प्रमुख ध्येय होते.

मनपाच्या विविध गोरगरिबांसाठी सामाजिक व आर्थिक सहाय्याच्या योजना त्यांनी मिळवून दिल्या आहेत, गुणवंत विद्यार्थी आर्थिक सहाय्य, परदेशी शिक्षण सानुग्रह अनुदान, विधवा अपंग अर्थ सहाय्य आदी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुरस्कृत समाज विकास योजना यावर त्यांनी गरजू माता, भगिनी आदींना विविध लाभ मिळवून दिले.

सन 2022 मध्ये ऑडिट विभागात बदली झाली. येथे लेखापाल पदावर प्रमोशन मिळाले व शासकीय नियमानुसार 31 मे 2024 रोजी ऑडिट विभागातून पालिकेतील एकूण 33 वर्षे सेवा करून वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झालो.

लेखक – दारासिंग मन्हास
पत्ता – भागीरथी हाउसिंग सोसायटी रुपीनगर, तळवडे, पुणे 62

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय