मुंबई : पावसाचे कारण देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कारणाने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आलेले आहेत. आता सुरु असलेल्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. अनेक संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक निवडणुका पुढे ढकलल्या ही अत्यंत लोकशाहीविरोधी कृती आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग आहे, अशी टिका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
डॉ. नवले म्हणाले, राज्यभरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळेच शिंदे भाजपा सरकारने हा लोकशाही विरोधी निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा धिक्कार करत आहे.
राज्य सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व सहकारी संस्थेत लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही डॉ. नवले यांनी केले आहे.